नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा आदर्श निर्णय; मानधन नाकारून गरजू रुग्णांसाठी ‘महापौर निधी’ला वर्ग

पुणे,दि.०९ :- पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २५ (ब) मधून नवनिर्वाचित झालेले भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी समाजाभिमुख असा आदर्श निर्णय जाहीर केला आहे. नगरसेवक म्हणून मिळणारे मासिक मानधन व इतर सर्व प्रकारचे भत्ते स्वीकारण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला असून, ही संपूर्ण रक्कम ‘महापौर निधी’मध्ये जमा करून ती शहरातील गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात यावी, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १९ (अ) १ अंतर्गत निर्वाचित सभासदांना मिळणारे मानधन आपण स्वीकारणार नसल्याचे मानकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. दरमहा मिळणारी मानधनाची रक्कम ‘महापौर निधी’मध्ये वर्ग करण्यात यावी आणि त्यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या निर्णयाबाबत बोलताना मानकर म्हणाले, “राजकारण हे माझ्यासाठी समाजसेवेचे माध्यम आहे. नागरिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझे खरे मानधन आहे. करदात्यांच्या पैशातून मिळणारे मानधन पुन्हा समाजाच्या सेवेसाठी वापरले गेले, तर त्यापेक्षा समाधानाची बाब दुसरी नाही. अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते; माझ्या मानधनाचा उपयोग त्यांच्या मदतीसाठी व्हावा हीच भावना आहे.”
त्यांच्या या उपक्रमामुळे लोकप्रतिनिधींनी सामाजिक जबाबदारी स्वीकारत जनहिताला प्राधान्य द्यावे, असा सकारात्मक संदेश समाजात जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *