वडगाव जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीसाठी गुरुवारी पुण्यात मोठी पाणी कपात; शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

पुणे,दि.१० : – शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी (एक दिवस) पुण्यातील मोठ्या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही शुक्रवारी पाणी उशिरा आणि कमी दाबाने येण्याची शक्यता पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.
पालिकेच्या माहितीनुसार, वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या टप्पा क्रमांक १ मध्ये तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विशेष कामे हाती घेतली जाणार आहेत. यामध्ये मुख्य जलवाहिनीवर ‘बंद प्लेट’ बसविणे तसेच तीन नवीन किऑस्क बसविण्याचे क्लिष्ट काम करण्यात येणार आहे. या कामासाठी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद ठेवणे आवश्यक असल्याने ही कपात जाहीर करण्यात आली आहे.
कोणत्या भागांना फटका?
दुरुस्तीमुळे शहरातील खालील प्रमुख भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे:
सिंहगड रस्ता परिसर :
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव (संपूर्ण परिसर)
कात्रज – सातारा रस्ता परिसर :
कात्रज गावठाण, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, दत्तनगर, संतोषनगर, सुखसागर नगर
दक्षिण पुणे :
कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर, बालाजीनगर तसेच प्रभाग ४१ मधील सर्व सोसायट्या
पालिकेने नागरिकांना आधीच पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्ती नंतर जलवाहिन्यांमध्ये अडकलेला हवेचा दाब (Air Pressure) काढण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा उशिराने सुरू होण्याची शक्यता अधिक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *