पुणे,दि.१० : – पुणे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी २०२६) पहाटे ६ वाजता खराडी येथील बोराटेनगर परिसरात मोठी कारवाई करत तब्बल १ लाख ८५ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत कच्चे-पक्के शेड व बांधकामे निष्कासित केली.
ही कारवाई उपआयुक्त सोमनाथ बनकर तसेच मुख्य सुरक्षा अधिकारी व सहाय्यक अतिक्रमण विभाग प्रमुख डॉ. रमेश शेलार यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आली. अतिक्रमण विभागाचे प्रकाश वालगुडे व अशोक भवारी यांच्यासह बांधकाम विकास विभागाच्या झोन क्रमांक १ मधील उपअभियंता विवेक डुब्बेवार, कार्यकारी अभियंता सदानंद लिटके, उपअभियंते निलेश सैतवाल, वर्षा जाधव तसेच इतर अभियंते आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान मनपा पोलिसांचे २५ कर्मचारी, एमएसएफचे ९० जवान, १५ जेसीबी, १५ ट्रक, १० गॅस कटर, ५ ब्रेकर, १ जॉ कटर तसेच ३० अतिक्रमण निरीक्षक आणि २२५ विगारी सेवक यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला.
मनपाने वाढत्या अनधिकृत बांधकामांवर कठोर भूमिका घेत ही मोहीम राबविली असून, शहरातील अतिक्रमणांविरोधात अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
