बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’ संपन्न

नवी मुंबई,दि.9(विमाका):- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील शीख, सिकलगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय समाजातील प्रतिनिधींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आरम्भता की ‘अरदास’ खालसा भिंडरावाले, मुखी दमदमी टकसाल, प्रधान संत समाजचे संत ज्ञानी हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई येथे आज करण्यात आली.
यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजा दयानिधी, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपायुक्त विजय म्हसाळ, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, रश्मी नांदेडकर, वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे, हिंद दी चादर कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, क्षेत्रिय आयोजन समिती, नवी मुंबईचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावा, सुप्रीम कॉन्सील, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष श्री. जसपाल सिंग सिद्धू, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे श्री. चरणदीप सिंग (हॅप्पी सिंघ), राज्यस्तरीय समितीचे निमंत्रक तथा महाराष्ट्र राज्य पंजाब अकॅडमीचे कार्याध्यक्ष बल मिलकित सिंग, उपजिल्हाधिकारी रविंद्र राठोड, नवी प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांच्यासह शीख, सिकलगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय समाजातील प्रतिनिधी उपस्थिती होते.
संत ज्ञानी हरनाम सिंघजीं नी सर्वप्रथम ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या बलिदानाविषयीचे माहात्म्य सांगितले. आजच्या काळात ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या शहादतविषयी जागर करणे का महत्वाचे आहे, याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन दिले. विशेषत्वाने त्यांनी प्रशासनाचे मनापासून कौतुक केले, आभार मानले. ते म्हणाले की, नागपूर आणि नांदेड या ठिकाणी “हिंद दी चादर” या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रशासनाच्या सहकार्याची खूप मोठी जोड होती. आणि आज खारघर, नवी मुंबई येथे देखील आजच्या आरंम्भता की “अरदास” कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या खुद्द विभागीय आयुक्तांपासून ते अगदी शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या उत्साहातून हे स्पष्ट होत आहे की, येथील कार्यक्रम देखील खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम उत्तमरित्या आयोजित करू या, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, खारघर येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीद जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून तयारी महिनाभरापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. रायगड व ठाणे जिल्हा प्रशासनाने 25 समित्यांची स्थापना करून विविध जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. नागपूर आणि नांदेड येथील यशस्वी कार्यक्रमांनंतर आता खारघर येथील कार्यक्रमाकडे देश-विदेशातील भाविकांचे लक्ष लागले आहे.
कार्यक्रमासाठी प्रशासन, पोलीस व महानगरपालिका यंत्रणा समन्वयाने दिवसरात्र कार्यरत असून भाविकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांनी दिली. गुरु नानक नामलेवा समिती, शीख समुदाय तसेच विविध समाजघटकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात पार पडणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी प्रास्ताविक भाषणात गुरु तेग बहादूरजी यांच्याशी लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तथा भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय यांच्याशी निगडीत असलेला इतिहास सांगितला. तसेच त्यांनी नागपूर आणि नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर खारघर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व समाजबांधवांनी नि:स्वार्थ सेवाभाव ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *