पुणे, ता. ९ : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी सोमवारी झालेल्या निवड प्रक्रियेत भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी, तर भाजप-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) आघाडीचे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.
महापालिकेच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जांची छाननी करून इतर कोणतेही अर्ज वैध नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे दोन्ही पदांवर नागपुरे आणि वाडेकर यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. निकाल जाहीर होताच सभागृहात भाजप व मित्रपक्षाच्या नगरसेवकांनी जल्लोष साजरा करत घोषणाबाजी केली.

नवीन महापौर मंजुषा नागपुरे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगत पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि नागरिकाभिमुख सेवा सुधारण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनीही सत्ताधारी पक्ष व प्रशासन यांच्या समन्वयातून प्रलंबित कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या निवडीमुळे पुणे महापालिकेत भाजप व मित्रपक्षाची सत्ता कायम राहिली असून आगामी काळात शहरातील विकासकामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
