संविधान दिनानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन

पुणे, दि. 24 ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता भिडेवाडा, बुधवार पेठ, पुणे येथे संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून या संविधान रॅलीची सुरुवात करण्यात येणार आहे. ही रॅली भिडेवाडा – लाल महाल – फडके हौद – दारूवाला पूल – १५ ऑगस्ट चौक – जुनी जिल्हा परिषद मार्गे पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ससून रुग्णालयासमोर, पुणे स्टेशन येथे पोहोचणार असून तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप होणार आहे.

रॅलीमध्ये समाज कल्याण विभाग व बार्टी, पुणे येथील सर्व अधिकारी-कर्मचारी, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्य, तृतीयपंथी व्यक्तींसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच तृतीयपंथी व्यक्ती आणि विविध सामाजिक क्षेत्रातील संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

नागरिकांनी संविधान रॅलीत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल मंगल अशोक लोंढे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *