पुणे.दि .१९:- सद्य स्थितीतील आरोग्य सेवेची गरज ओळखून केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही स्वतंत्र ‘आयुष’ मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) विधानसभेत बोलताना केली.
महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य आहे. मात्र, आपण पारंपरिक आणि प्रतिबंधात्मक उपचार पद्धतींकडे दुर्लक्ष करत आहोत. बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, ताणतणाव आणि आम्लपित्ताचा त्रास असे आजार महाराष्ट्रात वेगाने वाढत आहेत. या आजारांवर ॲलोपॅथी उपचार पद्धतीनी उपचार केले जातात. परंतु आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या उपचार पद्धतीत आजार होऊच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देतात. या सर्व पद्धती एकत्र असण्याकरता ‘आयुष’ मंत्रालयाची स्वतंत्रपणे स्थापना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना केले.
सध्या ‘आयुष’ या विषयाशी संबंधित जबाबदाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, कृषी विभाग अशा विविध विभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. या सर्व सेवा एकाच छताखाली येण्यासाठी ‘आयुष’ मंत्रालयाची आवश्यकता आहे. देशातील सर्वाधिक ‘आयुष’ महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. स्वतंत्र मंत्रालय झाल्यास निसर्गसंपन्न आणि धार्मिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राला आपण ‘ग्लोबल आयुष हब’ म्हणून विकसित करू शकतो, असा विश्वास आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.
