शिवाजीनगर परिसरात गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे, दि.१२ :-  शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपीकडून गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
दि. ११ मार्च २०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाचे सपोनि संतोष पाटील तसेच पोलीस अंमलदार दीपक चव्हाण व सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ एक सराईत गुन्हेगार गावठी पिस्तुल घेऊन येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिवाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात सापळा रचला.
या कारवाईत सिद्धार्थ अनिल बोऱाडे (वय २०, रा. ज्ञानेश्वरनगर, तळेगाव दाभाडे, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आरोपीने हे पिस्तुल कुठून मिळवले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
तपासात आरोपी सिद्धार्थ बोऱाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच तळेगाव दाभाडे, पिंपरी-चिंचवड परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ कृष्णेश रावले व सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिवाकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *