पुणे : पुण्यातील युनिव्हर्सिटी चौकातील फ्लायओव्हरचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले. या फ्लायओव्हरच्या कामाबाबत काही छायाचित्रे समोर आल्यानंतर त्यामधील तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या कामाचा सखोल तांत्रिक अभ्यास केल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. कदाचित हा मोठा स्ट्रक्चरल दोष नसू शकतो; मात्र उघड्या डोळ्यांनी पाहताना काम करताना हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारी कामांमध्ये अशा त्रुटी नवीन नसल्या तरी ज्या व्यक्तीच्या स्मरणार्थ हा फ्लायओव्हर समर्पित करण्यात आला आहे आणि ज्या व्यक्तीने त्याचे उद्घाटन केले आहे, त्या व्यक्तींच्या कार्यशैलीचा हा अपमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दिवंगत अजित पवार हे कामाच्या दर्जाबाबत आणि सौंदर्याबाबत अत्यंत काटेकोर आणि जागरूक होते, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही स्वभाव तसाच असल्याचे निम्हण यांनी सांगितले.
हा दोष कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा नेतृत्वाचा नसून प्रशासकीय ढिसाळपणा आणि बेजबाबदारपणामुळे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. राज्याचे नेतृत्व पुणे शहराला जागतिक नकाशावर नेण्याचा प्रयत्न करत असून अर्थसंकल्पातही त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र शहराच्या पायाभूत सुविधांचा दर्जा आणि सौंदर्य टिकवणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
युरोप, सिंगापूर किंवा चीनमधील सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये केवळ दर्जाच नाही तर सौंदर्यही जपले जाते. जागतिक स्पर्धेत उतरायचे असेल आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या व गुंतवणूक आकर्षित करायची असेल तर अशा प्रकारचा दृश्य गलथानपणा टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्घाटनापूर्वी किमान अंतिम पाहणी तरी झाली पाहिजे होती, असे सांगत या प्रकरणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा पुण्याला जागतिक नकाशावर नेण्याचे स्वप्न अपूर्ण राहण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
“मी एक लोकप्रतिनिधी म्हणून सरकारचा प्रतिनिधी आहे; मात्र त्याआधी पुणे शहराचा जागरूक नागरिक आणि अभियंता देखील आहे,” असेही सनी विनायक निम्हण यांनी शेवटी नमूद केले.
