पुणे ग्रामीण पोलिसांनी मावळ तालुक्यातील धोकादायक गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत त्याला महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही वर्षांत संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी होणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करण्यात आली होती. त्यानुसार कामशेत पोलीस ठाणे हद्दीतील शुभम उर्फ आमच्या सोमनाथ लालगुडे (वय 21, रा. भिंगणगर, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले.
या आरोपीविरुद्ध मारहाण, जीवघेणा हल्ला, जबर दुखापत करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे 2024 आणि 2025 दरम्यान दाखल झाले आहेत. आरोपीच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कामशेत पोलीस ठाण्याकडून सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाचा आढावा घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. जितेंद्र बुडके यांनी आरोपी शुभम उर्फ आमच्या सोमनाथ लालगुडे याला एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे दि. 12 मार्च 2026 रोजी दाखल केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन टेम्भे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
