सिंहगडावर ‘आपला मावळा’ची स्वच्छता मोहीम खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकाराने शेकडो शिवभक्तांचा सहभाग

पुणे : प्रतिनिधी, सिंहगड किल्ल्यावर ‘आपला गड, आपली जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली. खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून आयोजित या मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “गड-किल्ल्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. मी खासदार म्हणून नव्हे, तर शिवरायांचा मावळा म्हणून या मोहिमेत सहभागी आहे,” असे खासदार लंके यांनी यावेळी सांगितले.

सकाळी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे समाधीस्थळावर जिजाऊ वंदना आणि संवर्धन प्रतिज्ञेनंतर मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर गडावरील २१ पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणांची स्वच्छता केली.
कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, पुरुष बालेकिल्ला, राजाराम महाराज समाधी परिसर, तानाजी मालुसरे समाधी परिसर अशा प्रमुख ठिकाणी प्लास्टिक, काच, कागद, काटेरी झुडपे, वाळलेले गवत काढण्यात आले. पायवाटा खुल्या करण्यात आल्या.

या मोहिमेत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिताताई इंगळे , सुरेखाताई दमिष्टे , इतिहास संशोधक डॉ. नंदकिशोर मते, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर, पद्माकर लायगुडे निलेश द मिस्टेक दीपक खिरीड अनिकेत चव्हाण वरीष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वायकर , सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब इंगळे,‘आपला मावळा’ संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर निमसे, यांसह नगर, सातारा, सांगली आणि पुण्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वयंसेवक व सहभागींंची संपूर्ण व्यवस्था धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष अनिकेत चव्हाण यांनी केली. भोजनाची व्यवस्था दीपक खिरीड यांनी गोरे बुद्रुक येथील धर्माजी बाबा मंदिर परिसरात केली.

आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याच्या एका रविवारी विविध किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन मोहिमा राबवण्यात येत आहेत. शिवनेरी, रायरेश्वर, भुदरगड, धर्मवीर गड, तिकोना, येथेही यापूर्वी अशीच मोहीम पार पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *