पुणे : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून अंधारातही भविष्य घडविता येते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास जीवनात अंधार ही अडचण न राहता शारीरिक अक्षमतांना क्षमतांमध्ये रुपांतरीत करता येऊ शकते. डॉ. दीपक शिकारपूर यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हे आधुनिक तंत्रज्ञान ब्रेल लिपीद्वारे समाजासाठी उपलब्ध करून दिले आहे, त्यांचे हे कार्य स्पृहणीय आहे, असे गौरवोद्गार जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.
तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि प्रख्यात डिजिटल साक्षरता कार्यकर्ते डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स2025++’ या ब्रेल लिपितील पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 24) डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ॲडम्स् कोर्ट, बाणेर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंडच्या प्रवक्त्या सकिना बेदी, फिडेल सॉफ्टच्या व्यवस्थापकीय संचालिका प्राची कुलकर्णी, जागृती स्कूल फॉर ब्लाईंडच्या व्यवस्थापक सविता गायकवाड, कौशल्य विकास मार्गदर्शक ऋजुता भागवत तसेच शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
डॉ. दीपक शिकारपूर अनेक वर्षांपासून दृष्टिहीन व्यक्तींच्या साक्षरतेसाठीही काम करत आहेत. त्यांचे तंत्रज्ञानविषयक साहित्य ब्रेल लिपीमध्ये रुपांतरित करून राज्यातील अंधशाळांमध्ये वितरित करीत आहेत. सध्याच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) प्रत्येकासाठी आवश्यक कौशल्य बनले आहे. दृष्टिहीन व्यक्तींना हे कौशल्य आत्मसात करण्यावर मर्यादा येतात. ही त्रुटी लक्षात घेऊन डॉ. शिकारपूर यांनी ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स2025++’ पुस्तकाची ब्रेल आवृत्ती विकसित केली आहे. ‘आर्टिफिशिअल इंटेलजन्स 2025++’ हे त्यांचे 63वे पुस्तक दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.
पुस्तकाविषयी बोलताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, पुस्तकात एआयचे प्रवाह, एआय तंत्रज्ञानाचा व्यवसायासाठी कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो अशा विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
