महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन : नगरसेवक सनी निम्हण

पुणे,दि.०६ :- महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व भक्तीमय वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता व साफसफाई अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे स्वच्छता अभियान रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. या उपक्रमाचे आयोजन श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना  सनी विनायक निम्हण (विश्वस्त, श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच नगरसेवक, पुणे महानगरपालिका) यांनी सांगितले की, महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. भाविकांना स्वच्छ व पवित्र वातावरणात दर्शन घेता यावे, तसेच आरोग्यदायी आणि सुरक्षित परिसर उपलब्ध व्हावा, हा या स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानात नागरिकांनी, शिवभक्तांनी तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सामूहिक सहभागातून मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि भक्तिमय करण्याचा संकल्प या उपक्रमातून साकार होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *