पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ५ हजार ६६० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती समोर केला सादर

पिंपरी, २८ फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आर्थिक वर्ष २०२६-२७ चे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचेकडे सादर केले. हे अंदाजपत्रक मूळ ५ हजार ६६० कोटी ७३ लाख (आरंभीच्या शिल्लकेसह) रूपयांचे तर केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ९ हजार ३२२ कोटी १७ लाख रूपयांचे असल्याचे यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना कारंडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रविणकुमार जैन, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, नगरसचिव मुकेश कोळप, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार, सह शहर अभियंता अजय सुर्यवंशी, मनोज सेठिया, उप आयुक्त संदीप खोत, डॉ. प्रदीप ठेंगल, सचिन पवार, ममता शिंदे, राजेश आगळे, व्यंकटेश दुर्वास, पंकज पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, यावर्षी अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग उपक्रमाद्वारे महापालिकेस मागील वर्षीपेक्षा दुप्पट म्हणजे सुमारे ४ हजार ९९६ सूचना प्राप्त झाल्या आहेत. या सूचनांमधील २९७ सूचनांचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. नागरिकांच्या या सूचना शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तसेच सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६ हजार २५६ कोटी ३९ लाख (शिल्लकेसह) इतकी रक्कम जमा होईल, हे अपेक्षित धरून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे प्रशासक यांचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभेमार्फत महापालिका सभेपुढे सादर केले होते. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५ हजार ६६० कोटी ७३ लाख (आरंभीच्या शिल्लकेसह) उत्पन्न अपेक्षित आहे व त्यात प्रत्यक्षात खर्च ५ हजार ६५५ कोटी ७३ लाख होईल व मार्च २०२७ अखेर ५ कोटी इतकी शिल्लक राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
……………
*क्षेत्रीय स्तरावर विकास कामांसाठी करण्यात आलेली तरतूद -*
महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी अनुक्रमे ६ कोटी २९ लाख, ११ कोटी ४९ लाख, १० कोटी २५ लाख, ११ कोटी ४४ लाख, ३ कोटी ७० लाख, ९ कोटी ३० लाख, ५ कोटी २८ लाख, ७ कोटी ९२ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.

………..
*अर्थसंकल्पाची खास वैशिष्ट्ये -*
महापालिकेच्या विकासकामांसाठी एकूण १ हजार १८६ कोटी रुपयांची तरतूद
स्थापत्य विशेष योजना या लेखाशिर्षाअंतर्गत ४३६.९४ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित
महापौर निधीसाठी ५० कोटी रूपयांची तरतूद
शहरी गरीबांसाठी (बीएसयुपी) अंदाजपत्रकात १ हजार ९५३ कोटी रुपयांची तरतूद
जेंडर बजेट – महिलांच्या विविध योजनांसाठी भरीव ९९ कोटी रुपयांची तरतूद
दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत ६८ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद
पाणीपुरवठा विषयक भांडवली विकास कामांकरिता १५५ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद
पी. एम. पी. एम. एल. करीता अंदाजपत्रकात ४०० कोटी रुपयांची तरतूद
भूसंपादनाकरिता १०० कोटी रुपयांची तरतूद
अतिक्रमण निर्मुलन व्यवस्थेकरिता १० कोटी रुपयांची तरतूद
स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद
अमृत २.० योजनेसाठी ५४ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद

………..
*चालू विकासकामे, प्रस्तावित प्रकल्प आणि उपक्रम –*
नवीन प्रशासकीय इमारत, पिंपरी येथील डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल, मोशी रुग्णालय, थेरगाव येथील पीपीपी कर्करोग रुग्णालय, अग्निशमन प्रबोधिनी इमारत, प्रभाग क्र. १६ मधील मामुर्डी ते सांगवडे / हिंजवडी पुल बांधकाम प्रकल्प, ड्रेनेज मास्टर प्लॅन, पीसीएमसी सिटी सेंटर, अण्णासाहेब मगर स्टेडियम, हरित सेतू आणि टेल्को रोड – एनएमटी प्रकल्प, पाणीपुरवठा सुधारणा प्रकल्प (भामा आसखेड जॅकवेल – अमृत २.० अंतर्गत), प्रधानमंत्री आवास योजना (चऱ्होली, डुडुळगांव, बोऱ्हाडेवाडी, पिंपरी, आकुर्डी), अ प्रभागातील मदनलाला धिंग्रा मैदानात नवीन क्रीडा संकुल, वाकड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट, तळवडे येथील सर्व्हे नं. १ गायरान जागेवर बायोडायव्हर्सिटी पार्क, विविध ठिकाणी वेस्ट टू वंडर (टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ) कलाकृती निर्मिती, मुळा नदी पुनराज्जीवन प्रकल्प, इंद्रायणी नदी पुनराज्जीवन प्रकल्प, मोशी कचरा डेपो, मोशी कचरा डेपो येथील बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प, सांडपाण्याचे पुर्नचक्रीकरण व पुर्नवापर प्रकल्प, एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, जल ही अमृत उपक्रम, सामाजिक उपक्रम (सखी आंगण), प्राथमिक शिक्षण विभाग (जल्लोष शिक्षणाचा पर्व ३, शालेय साहित्य खरेदी, भारत दर्शन यात्रा, काला घोडा महोत्सवात सहभागी शाळांना बक्षिसे, सी लर्निंग अंतर्गत निवडक शिक्षक, पर्यवेक्षक व अधिकारी यांना प्रशिक्षणाकरिता लडाख येथे शैक्षणिक भेट).

………..
*विभागनिहाय अंदाजपत्रक विकास कामांसाठी भांडवली खर्च पुढीलप्रमाणे -*
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकात विकास कामांसाठी भांडवली खर्चांतर्गत स्थापत्य विभागासाठी ७२७ कोटी ९२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून भूसंपादनासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. विद्युत विभागासाठी ३२ कोटी ७८ लाख रुपये, पाणीपुरवठा विभागासाठी १५५ कोटी ७३ लाख रुपये तसेच जलनि:सारण विभागासाठी १८ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण विभागासाठी २४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून ‘प’ अंदाजपत्रकांतर्गत विविध विकास कामांसाठी ३४ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन २०२६–२७ चा ५ हजार ६६० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा दस्तऐवज नसून शहराच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाचा ठोस आराखडा आहे. विकास कामांसाठी १ हजार १८६ कोटी रुपयांची तरतूद, स्थापत्य विभागासाठी ७२७ कोटी ९२ लाख रुपयांचा भांडवली खर्च, पाणीपुरवठा, भूसंपादन, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांसाठी केलेल्या भरीव तरतुदीमुळे शहराच्या दीर्घकालीन गरजांना गती मिळणार आहे. नागरिकांच्या सहभाग उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या सूचनांपैकी लक्षणीय सूचनांचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आल्याने हे लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासनाचे प्रतीक आहे. शहरी गरीब, महिलांसाठी जेंडर बजेट, दिव्यांग कल्याणकारी योजना, तसेच स्मार्ट सिटी, अमृत २.० आणि पीएमपीएमएलसाठी केलेली तरतूद ही सामाजिक न्याय आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेली ठोस पावले आहेत. प्रस्तावित आणि सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमुळे पिंपरी चिंचवड शहर अधिक सक्षम, सुजाण आणि आधुनिक शहर म्हणून विकसित होईल, असा विश्वास आहे, असे आयुक्त हर्डीकर यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *