ससूनमधील अतिदक्षता विभाग सुसज्ज व्हावेत त्यांचे इन्फेक्शन कंट्रोल ऑडिट व्हावे आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे,दि.२७ :- येथील ससून सर्वोपचार रुग्णालयातील मेडिकल, ट्रामा आणि सर्जिकल अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुसज्ज करण्याची गरज असून इंन्फेक्शन कंट्रोल ऑडिट करून सुधारणा करण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत बोलताना केली.

लक्षवेधी सूचनेव्दारे ससून रुग्णालयातील समस्या आमदार शिरोळे यांनी मांडल्या. रुग्णालयातील नवजात अर्भकांसाठी असणाऱ्या अतिदक्षता विभागातील डॉक्टर्स, परिचारिका हे विशेष प्रशिक्षित आहेत. त्या विभागात अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येतो. त्या विभागात संसर्ग होण्याचे प्रमाणही अत्यल्प असते. त्यामुळे नवजात अर्भकांना जीवदान मिळते. ही बाब प्रशंसनीय आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.

मात्र, याच रुग्णालयातील मेडिकल, ट्रामा आणि सर्जिकल अतिदक्षता विभागांची परिस्थिती नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता विभागाच्या तुलनेत चिंताजनक आहे. संसर्गजन्य नियंत्रण (इंन्फेक्शन कंट्रोल) चा अभाव आणि अस्वच्छता यामुळे मृत्यूदराचे प्रमाण वाढलेले आहे, ही बाब गंभीर आहे. या विभागांमध्ये बेड्सची संख्याही अपुरी आहे. आतिदक्षता विभागात वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि चतुर्थ श्रेणी कामगार यांची पदं मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. या सर्व परिस्थितीत सुधारणा व्हायला हवी, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *