पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्य मंत्र्यांनी लक्ष घालावे -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे,दि.२६ :- रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या तीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्य मंत्र्यांनी लक्ष घालावे, असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आहे.

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना बुधवारी आमदार शिरोळे यांनी ही मागणी केली. तसेच पुणे-नाशिक, पुणे-संभाजीनगर हे दोन सेमी हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्प लवकर व्हावेत. पुणे शहरासाठी दोन हायस्पीड स्टेशन्स व्हावीत, अशीही मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

शिवाजीनगर एसटी स्थानकाकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि महा मेट्रो यांच्यात एमओयू व्हावा, यासाठीही मुख्य मंत्र्यांनी लक्ष घालावे, अशीही मागणी शिरोळे यांनी केली.

मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्याचे समर्थन आमदार शिरोळे यांनी केले. महाराष्ट्राचा दावोस येथील सहभाग हा औपचारिक नव्हता, तर महाराष्ट्रात इंडस्ट्रीअल कॅपिटल आणण्यासाठी आणि औद्योगिक गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र हा विश्वासार्ह पर्याय आहे, ही प्रतिमा मजबूत करण्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

दावोस परिषदेत मुख्य मंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ३० लाख कोटी रुपयांचे एमओयू करण्यात आले. त्यातून तंत्रज्ञान, उत्पादन निर्मिती, सेवा या क्षेत्रात ४० लाख रोजगार निर्मिती होऊ शकेल, असा विश्वास आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. दावोस संबंधित गुंतवणुकीतून २०२९ सालापूर्वीच महाराष्ट्रात एक लाख कोटींच्या प्रत्यक्ष गुंतवणुकीचे उद्दीष्ट साधले जाईल, असा विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

परकीय गुंतवणुकीसाठी (एफडीआय)महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे केंद्र ठरले आहे. २०२५-२६ सालामध्ये ९१ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक झाली असून देशातील एफडीआय मधील गुंतवणुकीतील हे प्रमाण ३९ टक्के आहे आणि सध्याच्या राज्य सरकारच्या गतीमान कारभारामुळे हे घडून आले आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *