पुणे, दि. २४. :- पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने मंगळवार (दि.२४) रोजी शहरातील विविध भागांत मोठी कारवाई राबवून तब्बल २८ हजार चौरस फूट क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. यामध्ये येरवडा येथील रामवाडी परिसरातील ८० कच्च्या-पक्क्या झोपड्यांचाही समावेश आहे.
ही कारवाई उपआयुक्त सोमनाथ बनकर, मुख्य सुरक्षा अधिकारी तथा सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख डॉ. रमेश शेलार आणि महापालिका सहाय्यक आयुक्त प्रकाश वालगुडे यांच्या नियंत्रणाखाली सकाळी ९ वाजता सुरू करण्यात आली. पुणे पेठ, मोहम्मदवाडी, वडगाव शेरी, खराडी, बोपोडी, चिखलवाडी रोड, धनकवडी तसेच आंबेगाव बुद्रुक-खुर्द परिसरात एकाच वेळी पथके कार्यरत होती.
सिद्धार्थनगर, रामवाडी (येरवडा) येथील सि.स. नं. २१४५ व २१४३ तसेच २०४-२०५ मधील अनधिकृत कच्चे व पक्के शेड आणि झोपड्यांवर कारवाई करून ८० बांधकामे हटविण्यात आली.
कारवाईदरम्यान बांधकाम निर्मूलन विभागाचे फुंदे, कोकाटे, मंगेश गायकवाड, ढगे, मोहन चव्हाण, किरण देसले (कनिष्ठ अभियंते), तसेच प्रकाश महिंद्रकर, विवेक डुब्बेवार, गौरी गवते व राजेश खाडे (उपअभियंते) उपस्थित होते.
संपूर्ण मोहिमेसाठी १६ मनपा पोलीस कर्मचारी, १२ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, १२ जेसीबी, ५ गॅसकटर, ९ ब्रेकर आणि ५८ बिगारी सेवकांचा ताफा तैनात करण्यात आला होता. मनपाने अनधिकृत बांधकामांवर पुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले.
