पुणे, दि. २५ :-पुणे शहरातील वाढत्या वायू-प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेने बांधकाम क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करत धूळ-प्रदूषण नियंत्रणासाठी नवे उपाय आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पीएम 2.5 व पीएम 10 कणांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे.
पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांनुसार बांधकाम प्रकल्पांवर वायू-गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. बांधकाम ठिकाणी धूळ नियंत्रण उपाययोजना, पाणी फवारणी, साहित्य झाकून वाहतूक, तसेच रस्ते स्वच्छता यांसारख्या उपायांचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या संदर्भात पुणे महापालिका, पर्यावरण विभाग, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI India) आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था (IITM) यांच्या सहकार्याने विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पर्यावरण अधिकारी, बांधकाम व्यावसायिक संघटना तसेच NAREDCO पुणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, शहरातील वायू प्रदूषणात बांधकाम क्षेत्राचा मोठा वाटा असून ARAI च्या अभ्यासानुसार पीएम 10 प्रदूषणात सुमारे 21% योगदान बांधकाम व रस्त्यावरील धुळीचे आहे. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निरीक्षण, माहिती संकलन व तक्रार निवारण यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेकडून शहरात पीएम 10 आणि पीएम 2.5 मोजण्यासाठी विशेष यंत्रणा बसविण्यात येणार असून मिळालेल्या डेटाच्या आधारे कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर दंडात्मक कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी कचरा किंवा माती जाळू नये तसेच बांधकाम व्यावसायिकांनी धूळ कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
