पुणे,दि.०२:- पाषाण मधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांची उमेदवारी नाकारल्याने पाषाण गावात उत्सुर्फ बंद पाळण्यात आला. निम्हण हे पाषाण – बाणेर – सुस – महाळुंगे या प्रभागातून राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छूक होते. त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळणार म्हणून जाहीर केले होते. परंतु भाजपा मधील उमेदवाराने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने निम्हण यांचे तिकीट कापले गेले. त्यामुळे पाषाण मधील नागरिकांनी उस्फुर्त बंद पाळला. दरम्यान, पाषाण मध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पाषाण ग्रामस्थांनी प्रमोद निम्हण यांना पाठिंबा दिला.

प्रमोद निम्हण नगरसेवक असताना पाषाण – बाणेर परिसरात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास काम केले आहे. पाषाण तलावाचे सुशोभीकरण तसेच पाषाण गावातील पाणी प्रश्न सोडविण्यावर प्रमोद निम्हण यांनी भर दिला होता. तसेच त्यांच्या पत्नी सुषमा निम्हण यादेखील माजी नगरसेविका आहेत. पाषाण गावाला भाजी मंडई मिळवून देण्यासाठी निम्हण यांनी प्रयत्न केले होते. कोणाच्याही हाकेला सहज धावून जाणारा नेता म्हणून प्रमोद निम्हण यांची ओळख आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत प्रमोद निम्हण यांना निवडून देण्याचा निर्धार केला आहे.
दोन दिवसांपूर्वी पाषाण येथे परिसरातील नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यावेळी देखील प्रमोद निम्हण यांनी निवडणूक लढवावी असे एक मताने ठरविण्यात आले होते. अर्ज भरण्याच्या दिवशी ऐन वेळी प्रमोद निम्हण यांचे तिकीट कापल्याने प्रभागामध्ये नाराजी पसरली होती. भाजपामधून प्रवेश केलेल्यांना तिकीट दिल्याने बाहेरचा उमेदवार आम्हाला नको असा निर्धार प्रभागातील नागरिकांनी केला आहे. यावेळी प्रमोद निम्हण यांना मताधिक्क्याने निवडून देणार असा निर्धार नागरिकांनी केला.
