पुणे,दि.२५:-सह्याद्री इंटरनॅशनल शाळा, पुणे येथे दिनांक २२ डिसेंबर २०२५ (सोमवार) रोजी वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचा विषय ‘स्पोर्ट्स’ असा होता . हा भव्य कार्यक्रम ‘बालगंधर्व रंगमंदिर’ येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. किशोर शंकर निकम (मराठा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स )आणि श्री. उमेश वाघ हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या पर्यवेक्षक श्रीमती संयोगिता बोऱ्हाडे यांना श्रद्धांजली अर्पित करून झाली. संस्थेच्या संचालिका श्रीमती स्वाती निम्हण, डॉ. किशोर शंकर निकम आणि उमेश वाघ यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा लाभली. कोथरूड शाखेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा उदास यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण आनंदी व उत्साही बनवले. नर्सरी ते बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्यप्रकार सादर केले, तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी T20 वर्ल्ड कप या विषयावर आधारित प्रभावी नाट्यप्रयोग सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या सादरीकरणातून संघभावना, शिस्त आणि क्रीडावृत्तीचे दर्शन घडले.
या स्नेहसंमेलनात उत्कृष्ट विद्यार्थी, मागील शैक्षणिक वर्षातील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी, उत्कृष्ट पालक, तसेच राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या क्रीडापटू विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी प्रेरणा मिळाली.पाषाण शाखेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती पवार यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
