पुणे,दि.२३:- मध्य प्रदेशातील उमरटी गावातून पुणे शहरात तब्बल पाचशे गावठी कट्टे विकण्यात आले आहेत. या कट्ट्यांचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी केला आहे. यामुळे हे कट्टे ज्या ज्या गुन्हेगारी कारवायांत वापरले, त्यामध्ये संबंधित विक्रेत्यांनाही आरोपी केले जाणार आहे
इतकेच नव्हे, तर शनिवारी उमरटीतील कारवाईत अटक केलेल्यांना मोक्काच्या कक्षेत घेण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते उमरटीतील कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रविवारी पोलीस आयुक्तालयात सत्कार केला. या वळी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील, उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, उपायुक्त सोमय मुंडे, उपायुक्त कृषिकेश रावळे आदी उपस्थित होते.
या वेळी सांगण्यात आले, की कुख्यात गुंड शरद मोहोळच्या गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा हा मेड सन उमरटी असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आले. त्यानंतरच्या कारवायांमध्ये मेड इन उमरटीचेच कट्टे सापडत होते. नुकत्याच चतुश्रृंगी पोलिसांत दाखल झालेल्या एका गुन्ह्यात एका राजकीय कार्यकर्त्याकडे गावठी कट्टा सापडला होता. तोही उमरटीतून खरेदी केला होता. थोडक्यात पुण्यात कट्टा संस्कृती रुजण्यास उमरटी गावाचा मोठा हात आहे.
राजे रजवाड्यांसाठी बनवायचे शस्त्र
उमरटी नावाची दोन गावे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहेत. राजे रजवाड्यांच्या काळात या दोन्ही गावांत शस्त्रे तयार केली जात होती. ही शस्त्रे राजे रजवाड्यांसाठी, तसेच युद्धासाठी तयार केली जात होती. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात असलेल्या उमरटीतील पुढील पिढी शिकून कामधंद्याला लागली. मात्र, मध्य प्रदेशातील उमरटीतील नगरिकांनी त्यांचा पारंपरिक शस्त्र बनविण्याचा धंदा सोडला नाही. आता ते गुन्हेगारांना शस्त्र विकत आहेत.
येथे मध्य प्रदेशातील पोलीसही वारंवार छापे टाकतात; परंतु नागरिक हा व्यवसाय सोडायला तयार नाहीत. तेथे इतर राज्यातील पोलीस आल्यावर त्यांच्यावर हल्ला केला जातो. नुकतेच जळगाव पोलिसांचे एक पथक कारवाईला गेले असता, एका पोलीस उपनिरीक्षकास डांबून ठेवण्यात आले होते. पकडलेले आरोपी सोडल्यावर त्याची सुटका करण्यात आली. यामुळे पुणे पोलिसांनी सोबत शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथकही सोबत नेले होते.
गरज पडल्यास पुन्हा उमरटीत घुसू – अमितेश कुमार
उमरटीतील शस्त्र बनविण्याचे साहित्य पथकाने नेस्तनाबूत केले आहे. यामुळे तेथे पुन्हा लवकर शस्त्रनिर्मिती होणार नाही. मात्र, पुन्हा तेथून पुणे शहरात शस्त्रे दाखल झाल्यास उमरटी गावात पुणे पोलिसांचे पथक घुसेल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
