अमरावती, दि. १९ :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन निमित्ताने आणि स्वतःच्या वाढदिवसाच्या खास दिवशी कुमारी किअरा स्वप्निल खेडकर (वय ६ वर्षे) हिने राष्ट्रमाता जिजामाता यांची भूमिका साकारत आगळावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.

दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीदिवशीच किअराचा वाढदिवस साजरा केला जातो. यंदा शिवाजी महाराजांची वेशभूषा करण्याऐवजी, ज्या मातेनं या जगाला पराक्रमी, दूरदर्शी आणि धर्मनिष्ठ शिवाजी महाराज दिले त्या राष्ट्रमाता जिजामाता यांच्या भूमिकेतून शिवचरित्र व संस्कारांची आठवण करून देण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
अमरावतीतील ऐतिहासिक अंबागेट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे जाऊन किअराने जिजामाता वेशभूषेत छायाचित्रण केले. या माध्यमातून शिवरायांचे विचार, जिजामातांनी दिलेले संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आजच्या आधुनिक काळात मुलांमध्ये संस्कार, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजावी, तसेच लहान वयातच इतिहासाबद्दल अभिमान आणि संस्कृतीची जाणीव निर्माण व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे पालकांनी सांगितले.
किअराच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजामाता यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
