पुणे,दि.१९ : – खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक करून त्याच्याकडून ३ गावठी पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई १८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली.
आगामी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या आदेशानुसार अवैध धंदे, मोका पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपार चेकिंग व कारवाई सुरू असताना सिंहगड रोड व नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर दत्तात्रय सोनलकर (वय २५, रा. प्रसाद पार्कसमोर, डीएसके पायथा, धायरी, पुणे) याला प्रेयजा सिटी, वडगाव बुद्रुक येथे सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ३ गावठी पिस्तूल व १२ जिवंत काडतुसे बेकायदेशीररीत्या बाळगलेली आढळून आली. त्याच्यावर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत अष्टेकर (युनिट ३) यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर डवळे, उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पथकातील अधिकाऱ्यांनी केली.
