पुण्यात २१-२२ फेब्रुवारीला दुसरे प्रशासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन

पुणे,दि.१७ :- पुणे महानगरपालिका, यशदा आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे प्रशासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. ही माहिती यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर व संवादचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मराठी भाषा संवर्धन समितीच्या सचिव आशा उबाळे उपस्थित होत्या.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत असून पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम स्वागताध्यक्ष आहेत. यशदाचे महासंचालक निरंजनकुमार सुधांशू मुख्य संयोजक तर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार सहसंयोजक आहेत.
शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता महापौर मंजुषा नागपुरे व उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना वाङ्‌मय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
दिवसभर विविध विषयांवरील परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून ‘शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य लेखनातील आव्हाने’, ‘अभिजात मराठी भाषा व प्रशासन’ तसेच महाराष्ट्राबाहेरील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अनुभवकथन असे कार्यक्रम होणार आहेत. भारत सासणे, आनंद पाटील, सुशील गायकवाड, राजेश पाटील, ज्ञानेश्वर मुळे, विजय कुलांगे, कपिल शिरसाट, प्रतीक ठुबे, सुरेंद्रकुमार मानकोसकर यांसह अनेक अधिकारी-साहित्यिक यात सहभागी होणार आहेत.
सायंकाळी शासकीय अधिकाऱ्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कविसंमेलन तसेच भारत सासणे यांच्या कथेवर आधारित ‘मुर्गा’ या लघुपटाचे प्रदर्शन होणार आहे.
रविवारी ‘स्पर्धा परीक्षा : संधी, समस्या व आव्हाने’, ‘माझे वाचन आणि लेखन’, ‘प्रशासकीय अधिकारी व साहित्य निर्मिती’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता-साहित्य क्षेत्रातील आव्हाने’ या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. शेवटी सायंकाळी ५ वाजता समारोप समारंभ होणार आहे.
हे संमेलन प्रशासकीय अधिकारी आणि साहित्य यांचा संगम घडवून मराठी भाषेच्या संवर्धनाला चालना देणारे ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *