शिवाजीनगर-घोले रोड परिसरात अतिक्रमण चा हातोडा

पुणे, दि. १४ : – शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बालगंधर्व चौक ते डेक्कन मार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज मोठी धडक कारवाई केली. उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी विद्यमान नगरसेविका सौ. पूजा जागडे, सौ. मेहेत्रे व नगरसेवक श्री. अपूर्व खाडे उपस्थित होते. कारवाईदरम्यान जेसीबी, गॅस कटर, ओपन ट्रक, बिगारी कर्मचारी तसेच महाराष्ट्र पोलीस सुरक्षा बलाचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रस्ते, पदपथ, फ्रंट मार्जिन व साईड मार्जिनमधील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. व्यावसायिकांनी अनधिकृतरीत्या ठेवलेल्या खुर्च्या-टेबल, लोखंडी जाळ्या, होजिअरी माल, हातगाड्या, फ्रीज तसेच पदपथावरील पथारी व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे पाच ट्रक साहित्य जप्त करण्यात आले असून फ्रंट व साईड मार्जिनमधील कच्चे-पक्के शेड आणि टपऱ्या निष्कासित करण्यात आल्या.
अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असून अनधिकृत व्यवसाय करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी कारवाईबाबत समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *