सुस-बाणेर-पाषाण भागातील ‘ रस्त्यांना वेग; तीन महिन्यांत जागा ताब्यात घेऊन कामे सुरू करण्याचे निर्देश

पुणे,दि.११:- सुस-बाणेर-पाषाण प्रभागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीतील निर्णयानुसार दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी पाषाण येथील सोमेश्वर मंदिर ते बाणेर-बालेवाडी परिसरात संयुक्त पाहणी केली.
पाहणीदरम्यान कसपटेवस्ती येथे पुणे-वाकड भागाला जोडणाऱ्या पुलाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची तसेच उर्वरित आवश्यक जागेची पाहणी करण्यात आली. तसेच सोमेश्वर मंदिरामागील डी.पी. रस्ते, इतर मिसिंग लिंक जागा आणि बालेवाडीतील सुस-नांदे रस्त्यावरील सनीज वर्ल्ड येथील खिंडीच्या रुंदीकरणाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला.
या वेळी जागा मालकांना तडजोडीने एफएसआय किंवा टीडीआर मोबदल्यात जमीन तातडीने मनपाच्या ताब्यात देण्याची विनंती करण्यात आली. भूसंपादन व न्यायालयीन प्रकरणांबाबत अतिरिक्त आयुक्तांनी माहिती घेत पथ विभाग, बांधकाम विकास विभाग व भूसंपादन विभागाला तातडीने चर्चा करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पुढील तीन महिन्यांत महत्त्वाच्या मिसिंग लिंक रस्त्यांसाठी आवश्यक जागा ताब्यात घेऊन रस्त्यांची कामे सुरू करण्याबाबतही निर्देश देण्यात आले असून त्यानुसार संबंधित विभागांनी कार्यवाही सुरू केली आहे.
पाहणीवेळी उपस्थित:
बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, रोहिणी चिमटे (सभासद, पुणे मनपा), सौ. मयुरी राहुल कोकाटे यांचे प्रतिनिधी राहुल कोकाटे, मुख्य अभियंता राजेश बनकर, अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर यांच्यासह पथ विभाग, बांधकाम विकास विभाग व भूसंपादन विभागाचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *