पुणे दि,१५ : –तक्रारदार यांचे चुलत भावासह इतर तीन लोकांच्या वर ३९५ चा गुन्हा दाखल असून त्यांना इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीनासाठी मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कॉन्सटेबलला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. इंदापूर येथील प्रियदर्शनी शाळेसमोर सापळा रचून आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.
राहूल दत्तात्रय बढे (३०, इंदापूर पोलीस ठाणे, रा . बाबरस मळा प्लेन न .६ तिरूपती अपार्टमेंट इंदापूर जि. पुणे) असे पकडलेल्या पोलीस कॉन्सटेबलचे नाव आहे. याप्रकऱणी २६ वर्षीय तरुणाने तक्रार केली आहे.
तक्रारदार तरुणाच्या चुलत भावासह इतर तिघांवर इंदापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता. तर राहूल बढे हे इंदापूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्सटेबल म्हणून नेमणूकीस आहेत. त्या गुन्ह्यात जामीनासाठी मदत करण्यासाठी तक्रारदार तरुणाला त्यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार तरुणाने यासंदर्भात अॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केल्यावर बढे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रियदर्शनी शाळेजवळ अॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. आज दुपारी दीड वाजता बढे यांना तक्रारदार तरुणाकडून २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चौधरी, घार्गे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ढवणे, पोलीस नाईक कुंभार, म्हेत्रे यांच्या पथकाने केली.
अशा प्रकारे शासकिय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास अॅन्टी करप्शनच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अॅन्टी करप्शनचे पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.