मुंबई दि. १५ :- महाराष्ट्रात लोकसभा ४ टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे.
2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची नोंदणी झाली. 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 925 महिला असे प्रमाण होते. सन 2014 मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 889 महिला इतके होते आता मात्र सन 2019 मध्ये या प्रमाणात 1 हजार पुरुषांमागे 911 महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, ‘स्वीप’ (SVEEP – Systematic Voters Education and Elector Participation)कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक,साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात 2004 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 एकूण मतदार होते. 2009 लोकसभा निवडणुकीत एकूण 7 कोटी 29 लाख 54 हजार 58 मतदार होते. यामध्ये 3 कोटी 81 लाख 60 हजार 162 पुरुष मतदार आणि 3 कोटी 47 लाख 93 हजार 896 महिला मतदारांचा समावेश होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 2 कोटी 4 लाख 78 हजार 932 पुरुष मतदारांनी तर 1 कोटी 64 लाख 87 हजार 190 महिला मतदारांनी नाव नोंदवले. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 8 कोटी 7 लाख 98 हजार 823 मतदारांनी नोंदणी केली. यामध्ये 2 कोटी 66 लाख 22 हजार 180 पुरुष मतदार होते तर 2 कोटी 20 लाख 46 हजार 720 महिला मतदार होते. आता 2019 मध्ये 8 कोटी 73 लाख 30 हजार 484 एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 4 कोटी 57 लाख 2 हजार 579 पुरुष मतदार आहेत. तर 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 महिला मतदार आहेत.