पुणे,दि.१८:- मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गीकेमध्ये वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गीका प्रवाशांसाठी मागील वर्षी खुली करण्यात आली. गरवारे कॉलेज स्थानक ते रामवाडी स्थानक मार्गीकेवरील कामे अत्यंत वेगाने सुरू असून मार्च २०२३ अखेर गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गिकेचे काम पूर्ण करून सी. एम. आर. एस. इन्स्पेक्शन करण्यात येणार आहे. तदनंतर ही मार्गीका प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. या मार्गिकेवर डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक आणि रुबी हॉल क्लिनिक ही महत्त्वाची स्थानके आहेत. ही मार्गिका खुली करण्यात आल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफसी रोड), जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, पुणे मनपा, दिवाणी न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी आणि जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज इत्यादी महत्त्वाची ठिकाणे मेट्रो द्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा होणार आहे. या मेट्रो स्थानकांपैकी डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानक यांचे काम अत्यंत आव्हानात्मक होते आणि त्या आव्हानांवर मात करत ती स्थानके पूर्णत्वाकडे आली आहेत.
डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान या स्थानकांची वैशिष्ट्यपूर्ण रचना असल्यामुळे ही स्थानके पुण्याची शान असणार आहेत. या स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याच्या पगडीच्या आकाराप्रमाणे करण्यात आली आहे. सुमारे १४० मीटर लांब, २६ मी उंच आणि २८ मीटर रुंद अशा भव्य स्थानकांची रचना मावळा पगडी प्रमाणे करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. स्थानकांच्या छताची रचना त्रिमितीय असल्यामुळे स्थानकाच्या लांबीच्या दिशेने छताच्या रुंदी आणि उंचीमध्ये फरक पडतो. त्यामुळे छतावर असलेल्या प्रत्येक लोखंडी खांब, मेंबर्स आणि रूफ शीट या प्रत्येकाची लांबी, उंची व रुंदी भिन्न आहे. अशा प्रकारचे तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट बांधकाम वेळ खाऊ आणि तांत्रिकदृष्ट्या खूपच अवघड असते, कारण प्रत्येक लोखंडी खांब, मेंबर्स आणि रूफ शीट यांचे आरेखन स्थानानुसार बदलते त्यामुळे अत्यंत्य सावधानी पूर्वक स्थानकाचे बांधकाम करावे लागते
प्रत्येक रूफ शीटचा बाक आणि लांबी वेगळी असल्याने त्याला बाक देण्यासाठी स्थानकाच्या जागेजवळ ‘प्रोग्रेसिव रोलिंग मिल’ बसवण्यात आले आहे. जेणेकरून गरजेनुसार रूफ शीटची बेंडिंग आणि क्रिपिंग जागेवरच करता येईल. रूफ शिटचे पीईबी स्ट्रक्चरला फिटिंग करताना वैशिष्ट्यपूर्ण फिटिंग फिक्चर चा वापर करण्यात येतो. जेणेकरून रूफ शीट स्टील स्ट्रक्चरला घट्ट बसेल आणि हवा, पाऊस, ऊन इत्यादी गोष्टींनी त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. विशिष्ट प्रकारचे फिक्सर्स लावल्याने छताला छिद्र पाडून नटबोल्ट लावण्याची गरज पडली नाही, त्यामुळे पाणी लीक होणार नाही.
डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान ही स्थानके नदीपत्रात असून स्थानकांची उंची जमिनीपासून ६० ते ७० फूट आहे. या दोन्ही स्थानकांचे छताची पगडी आणि नॉन पगडी असे काम करण्यासाठी विभागणी करण्यात आले होती. दोन्ही विभागाचे काम त्यांच्या त्रिमितीय रचनेमुळे आव्हानात्मक होते. दोन्हीही भागांसाठी वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे ही स्थानके अत्यंत विलोभनीय दिसणार आहेत. इतक्या उंच काम करणे आणि तेही तिन्ही मितीमध्ये निमुळत्या असणाऱ्या छतावर हे अत्यंत जोखमीचे आणि आव्हानात्मक होते. अशा उंचीवर विविध उपकरणे घेऊन रूफ शीट आणि पीईबी मेंबर लावण्यासाठी अत्यंत कुशल अशा कामगारांच्या आवश्यकता भासते. कुठलाही अनुचित प्रकार न घडता या छतांची कामे आता पूर्णत्वाकडे आली आहेत.
डेक्कन आणि संभाजी उद्यान स्थानक यांची विशिष्ट रचनेमुळे कामे आव्हानात्मक होती. त्याचप्रमाणे ही स्थानके नदीपात्रात असल्याने तेथे सामान घेऊन जाण्यासाठी खूप अवघडीचे होते. नदीपात्रात थेट असा रस्ता नसल्याने अवजड वाहने, क्रेन, काँक्रीट, ग्रॅनाईट, सिमेंट ब्लॉक, छतासाठी लागणारे मोठे लोखंडी खांब, रूफ शीट इत्यादी सामान ने- आण करण्यासाठी अडचणीचे होते. तेथे एका बाजूला नदीपात्र तर दुसऱ्या बाजूला झेड ब्रिज व छत्रपती संभाजी उद्यान यामुळे रूफ शीट चे क्रेनद्वारे काम करणे खूपच अडचणीचे ठरत होते. परंतु या सर्व आव्हानांवर मात करत या दोन्ही स्थानकांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत.
डेक्कन आणि छत्रपती संभाजी स्थानक ही स्थानके लवकरच प्रवाश्यांसाठी खुली होणार आहेत. यामुळे जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन जिमखाना, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता इत्यादी अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना मेट्रोद्वारे जाणे सहज शक्य होणार आहे. या स्थानकांवर जाण्यासाठी पादचारी पुलाद्वारे जंगली महाराज रस्ता व फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथून जाणे शक्य होणार आहे. या दोन्ही स्थानकांना पेठ भागाशी जोडण्यासाठी पादचारी केबल सस्पेंडेड पुलाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. त्यामुळे नारायण पेठ ते डेक्कन स्थानक व छत्रपती संभाजी स्थानक ते शनिवार पेठ ही दोन्ही ठिकाणे पादचारी पुलाद्वारे जोडली जाणार आहेत. यामुळे शनिवार पेठ, नारायण पेठ आणि त्या लगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मेट्रोद्वारे शहराच्या विविध भागात जाणे शक्य होणार आहे.
डेक्कन स्थानक आणि छत्रपती संभाजी स्थानक या दोन्ही स्थानकांदरम्यान मेट्रो व्हायडक्ट खाली एक पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. त्यामुळे हि दोन्ही स्थानके पादचारी पुलामुळे जोडले जातील. या विहंगम परिसराच्या शोभेमध्ये अधिकच भर पडणार आहे
याप्रसंगी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, “डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानक यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ही दोन्ही स्थानके अत्यंत देखणी अशा स्वरूपाची होत आहेत. या दोन्ही स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा पगडी पासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या स्थानकांसाठी काम करणाऱ्या कामगारांचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मला कौतुक करावे वाटते, इतक्या आव्हानात्मक परिस्थिती त्यांनी ही कामे पूर्णत्वाकडे आणली आहेत.”