मागील २ वर्षांचे कोरोना चे सावट बाजूला सारून यंदाचा २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जल्लोषात सुरु झाला. जानेवारीमध्ये होणारा महोत्सव पुढे ढकलल्याने सिने रसिकांची उत्सुकता ताणली गेली होती.
या महोत्सवात ७२ देशांतील १५७४ एन्ट्री आल्या असुन त्यापैकी १४० सिनेमे दाखवण्यात येत आहेत. त्यात मराठी स्पर्धेसाठी ७ मराठी सिनेमांची निवड करण्यात आली होती. त्यापैकीच एक म्हणजे डायरी ऑफ विनायक पंडित हा मराठी चित्रपट.
मयूर शाम करंबळीकर दिग्दर्शित डायरी ऑफ विनायक पंडित या सिनेमाचे सादरीकर दिनांक ३ फेब्रुवारी आणि ५ फेब्रुवारी रोजी पुण्यातील PVR ICON आणि INOX,Bund garden येथे झाले. या दोन्ही ठिकाणी झालेल्या सादरीकरणाला रसिकांचा तुफान प्रतिसाद लाभला.एका चित्रकाराच्या आयुष्यातील भावनांना अतिशय सुंदररित्या व्यक्त करणारी ही कथा रसिकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
या चित्रपटात अविनाश खेडेकर, पायल जाधव, सुहास शिरसाट हे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा महत्वाचा भाग म्हणजे संगीत आणि ही जबाबदारी लीलया पार पडली आहे निरंजन पेडगावकर आणि आनंदी विकास यांनी. चित्रपटात ४ गाणी आहेत,सुप्रसिद्ध गायक पदमश्री शंकर महादेवन, अभय जोधपूरकर, मंगेश बोरगावकर, जयदीप वैद्य आणि प्रियांका बर्वे यांचा आवाज या गाण्यांना लाभला आहे.
चित्रपटाची निर्मिती ही आदित्य देशमुख आणि वेदांत मुगळीकर आणि सहनिर्मिती हृषीकेश जोशी,व्यंकट मुळजकर,विनय देशमुख,समीर सेनापती यांची असून चित्रबोली क्रिएशन्स आणि वन कॅम प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने करण्यात आलेली आहे.