पुणे, दि. २२ :- ‘हटी हटीच्या आया बायांनो जागराला या या .. फेटेवालं मामा तुम्ही जागराला या या.. हो रे हो रे हो…!’ असे आवाहन करीत शाहिरी, लोकगीत, पोवाडा, बतावणी, भारुड आदी पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावागावात सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा जागर करण्यात येत आहे.अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सामाजिक न्याय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची जिल्ह्यातील गावांमध्ये १२ मार्चपासून प्रसिद्धी मोहीम सुरू आहे. १५ लोककला पथकाद्वारे ही जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून सामान्य जनतेपर्यंत माहिती पोहचवून त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.पद्मश्री कर्मवारी दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, रमाई आवास (घरकुल) योजना, कन्यादान योजना, अत्याचाराला बळी पडलेल्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ, उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळणारे निर्वाह भत्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती योजना, पुस्तक पेढी योजना, अनूसूचित जातीच्या सहकारी, औद्योगिक संस्थाना अर्थसह्याची योजना आदी योजनांची कलापथकांच्या माध्यमातून माहिती नागरिकांपर्यत पोहचविण्यात येत आहे.जिल्ह्यातील हवेली, मावळ, खेड (राजगुरुनगर), आंबेगाव, जुन्नर, बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर, वेल्हा, हवेली, शिरुर या तालुक्यात कलापथकाच्या माध्यमातून कार्यक्रम सुरू असून कार्यक्रमांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.