श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे ; संकष्टी चतुर्थी निमित्त द्राक्ष महोत्सवाचे आयोजन
पुणे,दि.२१ :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि पिवळ्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व केमिकल विरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.
द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्षे देऊ केली होती, मात्र करोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नव्हते. आता हा योग जुळून आला आहे.