सात वर्षानंतर मिळाली २५ लाख किमतीची जमीन; शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
कर्जत, दि.२१ :- ‘खाजगी सावकाराने शेतकऱ्याला दिलेल्या मुद्दल आणि त्या मुद्दलीच्या व्याजात सात वर्षांपुर्वीच जमीन लिहून घेतली असेल तर ती जमीन पुन्हा मिळू शकेल काय? असा प्रश्न कुणी विचारला तर प्रत्येकाचं उत्तर निश्चितच नाही असच असेल. पण सात वर्षे उलटून गेल्यानंतरही एका भूमिहीन शेतकऱ्याला त्याची जमीन पुन्हा मिळवून देण्याचं पुण्यकर्म कर्जतच्या पोलीस निरीक्षकांनी केलं आहे.खाजगी सावकारकीची पाळेमुळे नष्ट करणाऱ्या उपक्रमशील पोलीस निरीक्षकाच्या कर्तृत्वाचे समाजमनातून कौतुक होत आहे.
राहुल अधिदर जायभाय वय-२५(रा.कर्जत) या शेतकऱ्याने कर्जत मधील एका खाजगी सावकाराकडुन सन २०१५ साली ५ लाख रुपये ३ रुपये टक्के व्याजदराने घेतले होते.त्या बदल्यात सावकाराने ५३ गुंठे जमिनीचे खरेदीखत स्वतः च्या नावे करून घेतले होते.मात्र मुद्दलीची रक्कम आणि त्यावरील वाढत असलेले बक्कळ व्याज एकरकमी सावकाराला देणे जायभाय यांना जमले नाही.आपली जमीन आता कधीच आपल्याला परत मिळणार नाही या विचाराने व्यथित झालेल्या भूमिहीन शेतकऱ्याला मुलाबाळांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.सध्या बाजारभावाप्रमाणे या जमिनीची किंमत २५ लाख रुपये एवढी आहे. मात्र काहीही विचार न करता या शेतकऱ्याने थेट कर्जतचे पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यांची भेट घेऊन हकीगत सांगितली.शेतकऱ्याचे दुःख समजावून घेत त्यांनी सावकाराला बोलावून घेतले आणि समजावून सांगितले.चर्चेतून मुद्दल परत देऊन जमीन परत देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे सावकाराने १एकर तेरा गुंठे (५३ गुंठे) जमीन राहुल जायभाय या शेतकऱ्याच्या नावे करूनही दिली आहे.पोलीस निरीक्षकांनी हातातून निसटलेली रोजी रोटी पुन्हा मिळवून दिल्याने शेतकऱ्याने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व कर्जत पोलिसांचे आभार मानले.
समोर पाहताच शेतकऱ्याच्या अश्रुचा बांध फुटला!
आपल्या हातातून गेलेली जमीन पोलीस निरीक्षक यादव यांच्यामुळे परत मिळाल्याने राहुल जायभाय हे यादव यांचे आभार मानण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. यादव यांना पाहताच जायभाय यांच्या अश्रूचा बांध फुटला.’साहेब तुमचे उपकार कधीही विसरणार नाही असे म्हणत यादव यांचे पाय स्पर्शले.यामुळे पोलीस निरीक्षकही भावुक झाले होते.
पोलीस निरीक्षकांनी घडवले माणुसकीचे दर्शन!
‘पैशांची जमवाजमव करून ठरलेली रक्कम सावकाराला दिली.आता जमीन माझ्या मालकीची झाली आहे.पण साहेब,आता घरी जाण्याच्या खर्चाइतकेही माझ्याकडे पैसे नाहीत’ असे जायभाय म्हणाले तेंव्हा यादव यांनी गाडी खर्चासाठी अंमलदारामार्फत ५०० रुपये देऊन तिथेही माणुसकीचे दर्शन घडवले.