पुणे ग्रामीण, दि.२१:- खेडशिवापूर टोलनाक्या परिसरात राजगड पोलिसांनी शिताफीने प्रतिबंधित गुटखा वाहतूक करताना पकडला असून, टेम्पोसह २० लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल राजगड पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानाराम मिश्रीलाल चौधरी (वय ३२) व देवेंद्र गणपतलाल मेघवाल (वय २५, दोघेही रा. साई गणेश अपार्टमेंट फ्लॅट नंबर २०३ वडगाव (ता. हवेली) मूळ गाव मांडवा ता. मारवाड दक्षिण, जिल्हा पाली, राजस्थान) या दोघांविरोधात पोलिसांनी अन्न व सुरक्षा आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांचा माल वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी पहाटे पुणे-सातारा महामार्गावर करण्यात आली. याप्रकरणी खेडशिवापूर पोलीस ठाण्यातील हवालदार अजित माने यांनी फिर्याद दिली.राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहायक फौजदार कदम हे सरकारी वाहनाने रात्रगस्त करत असताना प्रतिबंधित गुटखा लाल व पांढऱ्या रंगाच्या टेम्पोमधून वाहतूक केली जात आहे. टेम्पोचा (एमएच ०४ एचएस २०२४) हा नंबर पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार पोलिसांनी त्यावर पाळत ठेवली व तपासणी करण्यास सुरुवात केली असता सदर टेम्पो सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात असताना दिसून आला.टेम्पो थांबवून दरबार हॉटेलच्या समोर बाजूला घेऊन चौकशी केली असता त्यामध्ये कानाराम चौधरी व देवेंद्र मेघवाल हे दोघेजण आढळून आले. त्यांनी गाडीमध्ये चुरमुरेची पोती असल्याचे सांगितले. मात्र, टेम्पोचा बंद दरवाजा खोलून आतमध्ये पाहिल्यानंतर पोती आढळून आली. या पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये पानमसाला व गुटखा आढळून आला. यामध्ये गुटखा असलेली १८० पोती आढळून आली. त्यावरून पोलिसांनी वरील गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.