पिंपरी चिंचवड,दि.२० :-खेड तहसील कार्यालयात पुरवठा अधिकारी व दुसरा पत्रकार असल्याचे भासवत गॅस शेगडी दुरुस्ती करणा-या दुकानदाराकडे जाऊन दुकानात गॅस सिलेंडर टाकी कशी काय ठेवली, असे म्हणत दुकानदारावर कारवाई करण्याची धमकी देत खंडणी घेणा-या दोघांना महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे.त्यातील एकजण खेड तहसील कार्यालयात पुरवठा अधिकारी तर दुसरा पत्रकार असल्याचे भासवत असे. ही कारवाई मंगळवारी (दि. 18) दुपारी करण्यात आली.
ज्ञानेश्वर त्रिंबक नेहे (वय 57, रा. प्राधिकरण मोशी), संदीप नानासाहेब बोर्डे (वय 35, रा. रुपीनगर, तळवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत माणिक पायगुडे (वय 25, रा. महाळुंगे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद आली आहे.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून महाळुंगे व परिसरातील गॅस शेगडी दुरुस्ती करणा-या दुकानदारांकडे दोन व्यक्ती येऊन, ते खेड तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी असल्याचे सांगून दुकानात गॅस सिलेंडर टाकी कशी काय ठेवली, तुमच्यावर कारवाई करणार आहे. कारवाई करायची नसेल तर प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये हप्ता चालू कर, अशी धमकी देत. तसेच तडजोड करून 5 हजार रुपये घेऊन जात. याबाबत महाळुंगे पोलिसांकडे तक्रार देखील आली होती.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरविंद पवार यांना माहिती मिळाली की, गॅस शेगडी दुरुस्ती करणा-या दुकानदारांकडे पैसे मागण्यासाठी जाणारा एक व्यक्ती पूर्वी पत्रकार म्हणून काम केलेला आहे. तो त्याच्या साथीदारासोबत येऊन पुरवठा अधिकारी असल्याचे भासवून दुकानदारांकडून पैसे घेत आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित दुकानदारांकडे आवाहन केले की, हे व्यक्ती पुन्हा पैसे मागण्यासाठी आल्यास पोलिसांना माहिती द्या.
मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास फिर्यादी प्रशांत पायगुडे हे त्यांच्या दुकानात काम करत असताना आरोपी दुकानात आले. त्यांनी खेड तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी असल्याचे सांगून खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी फिर्यादी यांच्या दुकानात जाऊन ज्ञानेश्वर नेहे आणि संदीप बोर्डे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ मंचक इप्पर व पोलीस उप आयुक्त , परिमंडळ २ श्री आनंद भोईटे,सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) दशरथ वाघमोडे स.पो. निरीक्षक सारंग चव्हाण , पोलीस हवालदार राजेंद्र कोणकेरी , अमोल बोराटे , ज्ञानेश्वर आटोळे , विठ्ठल वडेकर , तानाजी गाडे , किशोर सांगळे , युवराज बिराजदार , शिवाजी लोखंडे , शरद खैरे , श्रीधन इचके यांनी पार पाडली . सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण हे करीत आहेत .