काही दिवसांपूर्वी या चिमुरड्याचे अपहरण झाल्याची सोशल मीडियावर बातमी आली आणि काळजाचा ठोका चुकला. एरवी आपण कितीही शूर वीर असल्याच्या बाता मारत असलो तरी एक पालक म्हणून अशी वेळ आपल्यावर आली असती तर काय झाले असते याची कल्पना पण करवत नव्हती. औंध, बाणेर,पाषाण, बालेवाडी, परिसरात अचानक खूप असुरक्षित असल्यासारखी विचित्र मनस्थिती झाली होती. पण मनात विश्वास होता की असल्या अपप्रवृत्ती समाजात असतात आणि त्यांचा चोख बंदोबस्त करण्याची धमक आपल्या पोलीस दलात नक्कीच आहे. खाकी वर्दीतील हृदयात पण मानवी संवेदना असतात आणि त्या सामान्य माणसांपेक्षा पण अधिक प्रबळ असतात यावर माझा विश्वास आहे. तो विश्वास आज सार्थ ठरला.
चतुर्श्रुंगी पोलिसांची भूमिका आणि त्यांनी बजावलेली कामगिरी नक्कीच प्रेरणा देणारी आहे. माझ्यासारख्या पालकांना सुरक्षेचा अतूट विश्वास देणारी आहे. ‘सद रक्षणाय… खल निग्रहाय’ हे ब्रीद आज पुन्हा एकदा मनावर कोरले गेले. मी पुणे शहर पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त करतो. चव्हाण कुटुंबाच्या चेहर्यावर फुललेला आनंद असाच अबाधित राहो यासाठी प्रार्थना करतो.
स्वर्णव परतला… त्याला पण मनापासून शुभेच्छा… आणि महत्वाचे म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून हजारो नागरिकांनी सोशल मीडियावर या प्रसंगावर केलेली जनजागृती आणि आवाहन पर अभियान याचे मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा पुणे पोलीस आणि संबध यंत्रणेचे मनापासून आभार!
आपला नम्र
सनी विनायक निम्हण
मा.नगरसेवक