पुणे, दि.१९ :- पालिकेचे नकाशाप्रमाणे बांधकाम न करता कराराप्रमाणे बांधकाम न करता हलक्या व निकृष्ट पद्धतीने काम करुन इमारतीचे लिफ्ट, रंगकाम, लाईट, येण्या जाण्याचा रोड अशी कामे अपूर्ण ठेवून पोलिसाच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी विनायक डेव्हलपर्सच्या संचालकांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विनायक डेव्हलपर्सचे विनायक शिरोळे, अविनाश शिरोळे, निखील शिरोळे, सचिन जगताप, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१९ दरम्यान घडला.या प्रकरणी दिनकर बबन हनमघर (वय ४५, रा. सिद्धीविनायक सोसायटी, दत्तनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धीविनायक सोसायटीमधील विनायक रेसिडेन्सीमधील फ्लॅट पसंद पडल्याने आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन फ्लॅट बुक केल्यानंतर तुम्हास एक वर्षाच्या आत ताबा मिळेल. सर्व अॅमेनेटी मिळेल असे सांगून फ्लॅटची किंमत १४ लाख ५० हजार रुपये ठरविली. त्यानुसार फिर्यादी यांनी ९ लाख ४० हजार रुपये दिले.
परंतु, आरोपींनी बिल्डींगचे काम हलक्या व निकृष्ट पद्धतीने केले होते. बिल्डरने फिर्यादीस राहिलेले काम तुम्ही तुमच्या खर्चाने करुन घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी ४ लाख ७० हजार रुपये खर्च करुन काम करुन घेतले.फिर्यादी हे पोलिस दलात कार्यरत आहेत.
आरोपींनी बिल्डींगचे लिफ्ट, रंगकाम, लाईट, येण्या जाण्याचा रोड याची कामे अपूर्ण ठेवले असून काम करुन देण्यास टाळाटाळ करत आहे. आरोपीने पालिकेचे नकाशाप्रमाणे बांधकाम न करता सहकारी सोसायटी न नोंदवता इमारत सोसायटीस हस्तांतरीत केली असून काम अपूर्ण ठेवून पैशांचा अपहार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.