‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीव्ही मालिका आणि सोशल मिडियावरील आपल्या व्हिडिओ मुळे चर्चेत असणारी अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार आगामी ‘दिशाभूल’ या मराठी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या ‘दिशाभूल’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला.
सानवी प्रॉडक्शन हाऊसच्या “दिशाभूल” चित्रपटाचा मुहूर्त निलेशजी राठोड (गृहमंत्रालय, नवी दिल्ली), रुकिया कडावत (राठोड) (बांधकाम व्यावसायिक), दशरथ गायकवाड (विस्तार अधिकारी) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक आशिष कैलास जैन, डीओपी वीरधवल पाटील,
संगीतकार क्रिस मस्करेन्हस, प्रथमेश धोंगडे, विनोद नाईक, ऍड. प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ कडावत, योगेश गोल्हार आदी मान्यवर उपस्थित होते.
आरती चव्हाण यांची निर्मिती आणि आशिष कैलास जैन दिग्दर्शित ‘दिशाभूल’ या चित्रपटात माधुरी पवार बरोबर ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता तेजस बर्वे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. तसेच या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे, प्रणव रावराणे, अरुण कदम, सिद्धेश्वर झाडबुके, आशुतोष वाडेकर, शुभम मांढरे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे अशी तगडी स्टारकास्ट असून तेजससह मुख्य भूमिकेतील दूसरा अभिनेता कोण? याची उत्कंठा आता अधिकच वाढली आहे.
दिग्दर्शक आशिष कैलास जैन म्हणाले की, ‘दिशाभूल’ हा आजच्या तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये फ्रेंडशिप, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रीलर असा ट्रिपल धमाका असणार आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना निर्मात्या आरती चव्हाण म्हणाल्या, ‘दिशाभूल’ हा सानवी प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट आहे. तरुण कलाकारांना संधी देतानाच दिग्गज कलाकारांना आम्ही सोबत घेतले आहे. ‘दिशाभूल’ मधून आम्ही करत असलेला वेगळा प्रयोग प्रेक्षकांना भावेल असा विश्वास वाटतो.
आपल्या भूमिकेबद्दल सांगताना माधुरी म्हणाली, ‘दिशाभूल’ हा एक वेगळ्या धाटणीची कथा असलेलला चित्रपट आहे. यातील माझी व्यक्तीरेखा ही मी आज पर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आहे. चित्रपटाचे शुटींग सुरू झालं असून नवीन टीम सोबत काम करताना मजा येत आहे.