पिंपरी चिंचवड, दि.२३ :- अनेक महिन्यांपासून बंद असलेली रंगमंदिरे खुली झाली आहेत. आता कलाकारांना आपली कला थेट प्रेक्षकांसमोर सादर करता येणार आहे. रंगयात्री महोत्सवाच्या माध्यमातून कलाकारांचे कलाविष्कार पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे असे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी केले.
थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस रंगमंच यांच्या वतीने आयोजित रंगयात्री – रसिककला सेतू या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. पैस रंगमंच येथे रंगयात्री महोत्सवाचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तिसरी घंटा देऊन आणि दिपप्रज्वलन करुन महापौरांनी महोत्सव सुरु झाल्याचे जाहीर केले.
यावेळी माई ढोरे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सुरु केलेला रंगयात्री महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे. प्रेक्षकांना यामुळे एकाच रंगमंचावर अनेक कला पाहता येणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पं. ड़ॉ. नंदकिशोर कपोते यांची प्रकट मुलाखत श्रीकांत चौगुले यांनी घेतली. यावेळी पं. कपोते यांनी त्यांचा कथक नृत्यप्रवास उलगडला. कथकची आवड लहान वयात निर्माण झाली. त्यानंतर कथकचे शिक्षण सुरु केले. पंडित बिरजू महाराज, पं.गोपीकृष्णन, सितारादेवी यांसारख्या दिग्गजांचा सहवास लाभल्याने कथकनृत्याशी नाळ आणखी घट्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
कथकनृत्य सादरीकरणात विविध प्रयोग केले याची आठवण सांगताना बालगंधर्वांच्या जीवनावर आधारित केलेला अष्टनायिका प्रयोगाची गंमतीदार आठवण सांगितली. एकाच कार्यक्रमात स्त्री आणि पुरुष वेषात केलेले सादरीकरण अप्रतिम झाल्याने स्त्री वेषातील कपोते अनेकांना ओळखू न आल्याची आठवण त्यांनी सांगितली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कथकमधून जीवनप्रवास उलगडत एक वेगळा प्रयोग सादर केला ही आठवण विषद केली.
यावेळी कथक मध्ये काळानुसार कसा बदल झाला याला उत्तर देताना ते म्हणाले की, सुरुवातील कथक मंदिरात सादर होत असून तेव्हा वंदनेत कथक करत नसे. मुघलांच्या आक्रमणांनंतर अनेक बदल झाले. कलाकार राजनर्तक म्हणून काम करत. नर्तन शैलीतही बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्या घराण्याचे काय वैशिष्ठ हे सांगताना ते म्हणाले की, लखनौ, जयपूर , बनारस घराण्याची चक्कर तसेच ततकाराची पध्दत वेगळी आहे असे त्यांनी सांगितले. लॉकडाऊन मुळे गुरु पंडित बिरजू महाराज यांच्याकडून पुन्हा कथक शिकण्याची संधी मिळत असून ऑनलाईन क्लास गुरुजी घेत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. कोणतीही कला आत्मसात करताना सातत्य आणि संयम गरजेचा असल्याचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी पं. कपोते यांच्या शिष्यांनी गणेशवंदना सादर केली. पं. कपोते यांनी सादर केलेल्या परणच्या रचनेला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली.
महोत्सवाच्या दुस-या दिवशीची शनिवार(२३ ऑक्टोबर) सुरुवात मुकनाट्याने झाली. ऋतुजा दिवेकर, साक्षी धादमे यांनी मुकनाट्य सादर केले. त्यानंतर कोमल काळे हिने लावणी सादर केली. गझलपुष्प या संस्थेच्या वतीने गझलसंध्या कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी घाटपांडे, संगिता हळनोर यांनी केले. प्रास्ताविक प्रभाकर पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन बाळकृष्ण पवार, पवन परब, सुहास जोशी, अक्षय यादव, बाळ सावंत, सचिन बहिरगोंडे यांनी केले.