तक्रारदाराने पोलीस ठाणे गाठताच प्रकरण आपापसात मिटवले
कर्जत दि २९ :- कर्जत तालुक्यात खासगी अवैध सावकारी जोरात सुरू आहे. कर्जदारांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना अव्वाच्या – सव्वा व्याज दराने कर्ज देऊन मालमत्ता ताब्यात घेण्याचे प्रकार आजही घडत आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विना परवाना खाजगी सावकारकीचे नवनवीन किस्से आता कर्जत पोलिसांच्या आवाहनामुळे समोर येऊ लागले आहेत.आपल्या मनाप्रमाणे व्याजाचे दर ठरवून संबंधितांकडून अव्वाच्या-सव्वा रक्कम वसुल करायची,कधीकधी तर घेतलेल्या रकमेपेक्षा तिप्पट-चौपट रक्कम देऊनही जमिनीचे खरेदी खत नावावर करून घ्यायचे किंवा स्वाक्षरी करून घेतलेले धनादेश वटवायचे अशा अनेक घटना घडत आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, राशीन येथील किराणा दुकानदार संदेश सावंत (नाव बदलले आहे) याच्याकडुन तक्रारदार विजय निंभोरे, रा.राशीन यांनी सन २०१४ साली ५% व्याजदराने १ लाख रुपये घेतले होते.रक्कम देण्यापूर्वी बँकेचा एक धनादेशही घेतला होता.पैसे देण्यासाठी मध्यस्ती आणि वेळोवेळी व्याजाचे पैसे आणणे यासाठी आणखी एकजण रा.जानभरे वस्ती, राशीन हा होता.तक्रारदाराने जुन २०१४ ते एप्रिल २०१८ पर्यंत प्रतीमहिना ५००० रु. प्रमाणे २ लाख ३० हजार एवढी रक्कम दिली. मात्र तरीही सावकारांनी ऑगस्ट २०१८ साली घेतलेल्या धनादेशावर ३ लाख रुपये टाकून धनादेश वटवला.खात्यात रक्कम नसल्याने चेक बाऊन्स झाला.त्यावरून सावकाराने कोर्टात चेक बाऊन्स चा गुन्हा दाखल केला.सदरची केस एप्रिल २०२१ पर्यंत न्यायालयात चालु होती.एवढी मोठी रक्कम व्याजापोटी देऊनही आणखी ३ लाख रुपयांचा तगादा लावल्याने तक्रारदार निंभोरे यांनी कर्जत पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याअगोदर सावकारकीची प्रकरणे हाताळून नागरिकांना न्याय मिळवून दिला होता. तक्रारदार पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले असता आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार या धास्तीपोटी संबंधित खटला न्यायालयातून मिटवून घेत सदरचा व्यवहार सावकाराने परस्पर मिटून घेतला.सध्या कर्जत पोलिसांच्या धास्तीने अनेक प्रकरणे आपापसात मिटवून घेतली जात आहेत. तक्रारदार विजय निंभोरे आणि कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आभार मानले.
नागरीकांनो, कुणालाही न घाबरता पुढे या कर्जत पोलिसांचे आवाहन!
तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेल्या सावकारकीच्या जाचाला कंटाळून अनेक कुटुंबे धुळीस मिळत आहेत.अशा प्रकरणातून अनेक अनुचित प्रकारही घडतात. त्यामुळे नागरिकांनी कुणालाही न घाबरता कर्जत पोलिसांकडे याबाबत तक्रार द्यावी.त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील.-चंद्रशेखर यादव
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे