पुणे दि २६ :- नागरिकत्व सुधारणा कायदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या आधारावरच आहे. याद्वारे नागरिकत्व देण्यात येणार असून, कोणाचेही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. कोथरूडमधील सिटी इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष दामोदर कुंबरे,
संस्थेचे संचालक संजय कुंबरे, आशिष कुंबरे, रुपेश कुंबरे, कांचन कुंबरे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.श्री. पाटील म्हणाले की, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथील जनतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली. याद्वारे देशातील नागरिकांना त्यांचे अधिकार आणि कार्ये निश्र्चित करण्यात आली. राज्यघटनेमुळेच सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार मिळाला, त्याच प्रमाणे देशातील अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे रक्षण झाले.”
ते पुढे म्हणाले की, “ज्याप्रमाणे भारतातील अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण झाले, त्याप्रमाणे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश मधील अल्पसंख्याक हिंदू, शिख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांच्या हिताचे रक्षण झाले नाही. त्यामुळे त्यांना तो देश सोडून भारतात आश्रयाला यावं लागलं. अशांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे भारताचे नागरिकत्व देण्यात येत आहे. ना की कुणाचे नागरिकत्व काढून घेतलं जात आहे. त्यामुळे या कायद्यावरुन जो देशात गोंधळ घातला जात आहे. तो पूर्णपणे चुकीचाच आहे.”दरम्यान, राज्यातील विद्यार्थ्यांवर संविधानाचे संस्कार व्हावेत यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून संविधानाचे सामूहिक वाचनाच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे श्री. पाटील यांनी यावेळी स्वागत केले. तसेच, शालेय विद्यार्थ्यांसोबतच पालकांनी देखील संविधान वाचन करावे, असे आवाहन केले.