पुणे दि.२८ :- रब्बी व उन्हाळी हंगाम 2019-20 साठी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येईल, तसेच सर्व कालव्यांचे पाणी काटकसरीने वापरुन पाण्याची बचत करण्याच्या सूचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे अध्यक्ष तथा आमदार अजित पवार यांनी दिल्या.
आज शासकीय विश्रामगृहात खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक तसेच विविध कालव्यातील पाण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खा.गिरीश बापट, खा.अमर साबळे, आ. चंद्रकांत पाटील, आ.चेतन तुपे, आ. सुनिल टिंगरे, आ. सुनिल शेळके, आ.अशोक पवार, आ. अनंत गाडगीळ, आ. मुक्ता टिळक, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्यासह कालवे सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.
खडकवासला प्रकल्पांतर्गत हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती या चार तालुक्यातील वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे. असे सांगून श्री. पवार म्हणाले, खडकवासला प्रकल्पातून रब्बी हंगामात आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन मुठा उजवा कालवा 15 डिसेंबर 2019 ते 15 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आवर्तनाचे नियोजन करण्यात आले असून तसेच निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा, चासकमान प्रकल्प, भामा आसखेड प्रकल्प आदी प्रकल्पाच्या आवर्तनाचेही नियोजन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेने पाणी गळती बंद करुन वितरण व्यवस्था सुधारुन पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच पाण्याचा पुर्नवापर करुन पाण्याची बचत करावी जेणेकरुन अतिरिक्त पाण्याचा उन्हाळी हंगामासाठी शेतीला उपयोग होईल तसेच जायका प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीबाबत तातडीने कार्यवाही करावी, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
पवना प्रकल्पातून नदीव्दारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामात पाणी देण्याच्या सूचना देतांनाच पवना प्रकल्पग्रस्तांचे जागावाटपाचे प्रश्न तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करुन सोडविण्याचे निर्देश श्री.पवार यांनी संबंधीत यंत्रणेला दिले. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन सर्व भागातील नागरिकांना पाणी मिळेल याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही श्री. पवार यांनी दिल्या.
भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत तसेच भामा आसखेड पाईप लाईनची कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. विविध प्रकल्पांवरील सन 2009 पुर्वीची विहीरीवरील पाणीपट्टी आकारणी रद्द करण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करावेत तसेच जलसंपदा विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
कासारसाई मध्यम प्रकल्पाचा हिंजवडी परिसरात असणारा उजवा कालव्याचा 8 कि.मी. लांबीचा भाग रस्त्यामध्ये परावर्तीत करुन हिंजवडी परिसरात असणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही श्री.पवार यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीत प्रकल्पीय पाणीवापर नियोजन, खडकवासला प्रकल्प मंजूर पीक रचना व प्रत्यक्ष पीकरचना, खरीप हंगाम 2019- 20 प्रत्यक्ष पाणीवापर तपशील, खरीप हंगाम 2019-20 मध्ये जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेस सोडण्यात आलेले पाणी, धरणातील पाणीसाठा, पुणे महानगरपालिकेचा पाणीवापर, 2019-20 मधील रब्बी व उन्हाळा हंगामातील सिंचन पाणीवापराचे खडकवासला धरणस्थळी नियोजन, तालुकानिहाय रब्बी व उन्हाळी हंगाम क्षेत्रआधारीत पाणीवाटप, रब्बी हंगाम आवर्तन कार्यक्रम,उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध होणारे पाणी, 2019-20 मधील खरीप हंगामातील सिंचनाची सध्यस्थिती, सिंचन व्यवस्थापन कामकाजात येणाऱ्या अडचणी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.