पुणे दि 23: -कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व सिद्ध करतात. महिलांना एसटी चालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे पाऊल टाकले असून त्याचा आत्मविश्वास आणि धाडस सर्वांना प्रेरक ठरेल असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्यावतीने महिला चालक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री दिवाकर रावते होते. त्यावेळी प्रतिभाताई पाटील बोलत होत्या. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसळ, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेचे संचालक कॅप्टन राजेंद्र सनेल-पाटील, महामंडळाचे सरव्यवस्थापक माधव काळे उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, अनेक खडतर आव्हानांचा सामना करत एसटी महामंडळाचे काम यशस्वीपणे सुरू आहे. महामंडळाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध योजना समाजासाठी उपयुक्त आहेत. महिलांना एसटी चालकांचे प्रशिक्षण देऊन महामंडळाने त्यांना जगण्याचा नवा मार्ग दाखवला आहे. हे पाऊल अत्यंत धाडसी असून ते यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महामंडळाचा हा उपक्रम देशासमोर नवा आदर्श निर्माण करेल, असे त्या म्हणाल्या.
परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, एसटी महामंडळात सकारात्मकता निर्माण करण्याचे काम केले. महिला टॅक्सीचालक आणि महिलांसाठी अबोली रिक्षा हे प्रयोग केले, महिला सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले. 163 महिला चालक प्रशिक्षणाचा हा प्रयोग राज्यातील महिला-मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. रोजगार निर्माण करणे हेच परिवहन खात्याचे धोरण आहे, त्यातूनच रिक्षा चालक परवाने देण्याचे काम केले. एसटी कर्मचाऱ्यांसाठी जागतिक दर्जाचे डोळे तपासण्यासाठी पुण्यातील व्हिजन नेक्स्ट रुग्णालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच 55 वर्षानंतर स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे सर्व लाभ देण्याबरोबरच 10 लाख रुपये देण्यात येतील. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना पती-पत्नीसाठी 65 वर्षांपर्यंत मोफत प्रवासाची सवलत देण्यात येणार आहे. सध्या महामंडळात 36 हजार बस चालक असून पुढील काही वर्षात किमान 10 हजार महिला बस चालक असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आजचा दिवस महिला सक्षमीकरणासाठी ऐतिहसिक दिवस आहे. महिला सशक्तीकरणाच्या धोरणाचे कृतिशील पाऊल परिवहन महामंडळाने टाकले आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 15 महिला एसटी चालकांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले. एसटी महामंडळाचे कर्मचारी दत्तात्रय गायकवाड यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सन 2017 व 2018 साली विशेष कामगिरी केलेल्या एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित सिंह देओल यांनी केले. या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
*****
*15 महिला चालक प्रशिक्षणार्थीचे प्रातिनिधिक सत्कारमूर्ती*
▪प्रतीक्षा सूर्यकांत सांगवे,पुणे.
▪सरोज महिपती हांडे, कोल्हापूर.
▪मीना भीमराव व्हनमाने,सांगली.
▪पुनम अशोक डांगे, सोलापूर.
▪माधवी संतोष साळवे, नाशिक.
▪ज्योती तनखु आखाडे, जळगाव.
▪मंजुळा बिभीषण धोत्रे, धुळे.
▪रेशमा सलीम शेख, परभणी.
▪भाग्यश्री शालिकराम परानाटे,अमरावती.
▪भावना दिगंबर जाधव, बुलढाणा.
▪अंकिता अंकुशराव आगलावे, यवतमाळ.
▪गीता संजय गिरी, नागपुर.
▪रब्बना हयात खान पठाण, वर्धा.
▪राखी विजय भोतमांगे, भंडारा.
▪पौर्णिमा बाळकृष्ण कुमरे, गडचिरोली.