पुणे दि.०३ : – पुणे विभागातील सामाजिक न्याय विभागांंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कामकाजाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी महत्वपूर्ण बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) येथे झालेल्या या बैठकीला बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांच्यासह सर्व प्रकल्प संचालक उपस्थित होते. यावेळी बार्टीचे महत्वाचे विभाग, मनुष्यबळ, निधी, संशोधन विभाग, अधिछात्रवृत्ती विभाग व या विभागाच्या माध्यमातून देण्यात येणारे लाभ, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रकल्पाची माहिती, कौशल्य विकास विभाग आदी विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सविस्तर माहिती घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी आवश्यक बाबींचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवा असे सांगून बार्टीसाठी आर्थिक तरतूद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी सांगितले.