पुणे,दि.२४ :- पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय (ए) आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी शहर भाजपने कंबर कसली असून, प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात आज शहर कार्यालयात निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या समितीत ७० हून अधिक अनुभवी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील समित्यांची निर्मिती पूर्ण झाली आहे.
शहराध्यक्ष धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, उपाध्यक्ष राजेश पांडे, चिटणीस ऍड वर्षा डहाळे, संयोजक श्रीनाथ भिमाले यांनी मार्गदर्शन केले.
भांडारी म्हणाले, उत्तम निवडणूक व्यवस्थापनातून पुणे मतदारसंघात भाजप विक्रमी मताधिक्य मिळवेल असा विश्वास वाटतो. व्यवस्थापन पूर्ण झाले असून त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली आहे.
घाटे म्हणाले, बूथ समितीचे व्यवस्थापन, विविध समाज घटकांतील मतदार संपर्क, लाभार्थी संपर्क, प्रसिद्धी, डिजिटल माध्यमे, प्रचार व्यवस्थापन, साहित्य निर्मिती, नेत्यांचे दौरे, सभा मेळावे, आचारसंहिता आदी विषयांच्या समित्यांची स्थापना करून कामाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
मोहोळ यांना विविध समाज घटकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.