पुणे, दि.२१: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त आचारसंहिता भंगाच्या ६५ तक्रारींपैकी ६३ तक्रारींवर कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सी-व्हीजील पोर्टलवर आणि १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघात स्थापित स्थिर आणि भरारी पथकांना त्या भागातील तक्रार पाठवली जाते. त्यावर तात्काळ कार्यवाही करून पोर्टलवर नोंद केली जाते.
आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे नागरिकांना थेट निवडणूक प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.
नियंत्रण कक्षाला टोल फ्री क्रमांकावर प्राप्त तक्रारीवरही भरारी पथके आवश्यक कारवाई करतील, नागरिकांनी निवडणूक कालावधीत आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी सीव्हिजिल ॲप किंवा नियंत्रण कक्षाकडे नोंद करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.