पुणे, दि.२० : -पुण्यात भारती विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या एका विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आहे. याबाबत संबधीत पोलीस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला असून, अशा घटना घडू नयेत याच्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे, या घटनेच्या वस्तुस्थितीमध्ये जाऊन त्याबद्दलचे योग्य ते चार्जशीट पोलिसांनी दाखल करावं अशा प्रकारच्या सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत.
भारती विद्यापीठ मधील एका विद्यार्थिनीने रुममेटच्या त्रासाला कंटाळून आणि विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील मुलाच्या एकतर्फी प्रेम प्रकाराला घाबरून स्वतःला पेटून घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याप्रकरणाची उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी गंभीरपणे दखल घेतली. याबाबत त्यांनी सांगितले की, साधारण चार दिवसांपूर्वी या मुलीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर तिचे दुर्दैवी निधन झाले. या संदर्भात पुणे पोलिसांच्या भारती विद्यापीठाच्या सहायक पोलीस आयुक्त यांच्याशी दूरध्वनीवरून तपशीलवार चर्चा करणेत आलेली आहे. यामध्ये त्या मुलीचे पहिले मृत्यूपूर्व पत्र आहे त्यामध्ये तिने परीक्षेचा ताण असह्य झाल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे म्हटलेले आहे. दुसऱ्या मृत्यूपूर्व पत्रामध्ये रूममेट व कँटीन कर्मचाऱ्यांने त्रास दिला असं म्हटलेलं आहे.
विद्यापीठाच्या वसतिग्रहामध्ये विद्यार्थी जेंव्हा राहतात त्यावेळी त्यांना काही बंधने पाळावी लागतात. तसेच शासनाचे कायदे प्रमाणे सर्वांना वागावे लागते. शासनाच्या छळ प्रतिबंधक कायदा आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक शोषणाच्या विरोधी कायदा हे सर्व वस्तीगृहाला लागू आहेत. भारती विद्यापीठ हे अत्यंत प्रसिद्ध विद्यापीठ आहे. अशा निवासी वसतिगृहांच्या मध्ये असा कायदा आहे आणि आपल्याला कोणी त्रास दिला तर कोणाकडे तक्रार करायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. विद्यापीठां मधील सुप्रीटेंडंट्स किंवा युवक कल्याणशी अधिकाऱ्यांनी त्यांनी या मुलींना राहायला आल्यावर लगेचच या दोन कायद्यानुसार सविस्तर मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. अनेकदा पालकांचा मुलींवरती आणि मुलांवरती सुद्धा अभ्यासासाठी प्रचंड दबाव असतो. नवीन वातावरण, घराबाहेर राहायची सवय नाही, वसतिगृहात आल्यावर आलेला एकटेपणा या सगळ्यामुळे मुलं-मुली खूप तणावामध्ये असतात. अशा वेळेला कुटुंबीयांनी ही आपल्या पाल्याचे समुपदेशन करणे गरजेचे आहे.
सध्या या घटनेबाबत पोलीस तपशीलवार चौकशी करत आहेत आणि रूममेटने त्रास दिला तर त्याच्यामध्ये तिने प्रथम तक्रार किंवा माहिती कोणाकडे केली असेल तर त्याची माहिती पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तिच्या मानसिक आरोग्याबाबत तिने पूर्वी कोणाला माहिती दिली होती का ? आणि कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन असेल तर त्याची ही सखोल चौकशी करावी असे ही स्पष्ट करण्यात आलेले आहे असे डॉ नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे लेखी निवेदन निर्देश दिले आहेत. ज्या मित्र किंवा मैत्रीणीना तिच्या मानसिक अवस्थे बाबत काही माहीत असेल त्याची नावे गुपित ठेवून व त्यांना आवश्यक संरक्षण पुरवून माहिती गोळा करावी. अशा प्रकारच्या सूचनाही मी पोलिसांना दिलेल्या आहेत. वस्तीगृहात नव्याने रहावयास आल्यावर विद्यार्थ्यांना आवश्यक संरक्षण देण्याबाबत सूचना यापूर्वीच शिक्षण विभागाने घेतलेला आहे. यामध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक सूचना दिलेल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास संवेदनशील अधिकारी करत असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.