अहमदनगर,दि.२०:- शासनाचा कर बुडविण्याच्या हेतूने बनावट नंबर प्लेट लावून वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टेम्पोचा चालक व मालक अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांचे पथक केडगाव बायपास भागात पेट्रोलिंग करत असताना पुण्याहून नगरकडे येत असलेल्या आयशर टेम्पोवर ही कारवाई करण्यात आली आहे.
आयशर टेम्पोचा चालक दीपक अर्जून सोनवणे (वय ३८ वर्ष, वखारवाडी देवळा, श्रीरामपुर, जि.अहमदनगर) व टॅम्पोचा मालक दीपक कडू पवार (रा.बोसरे गल्ली टाकळी, ता.मालेगाव, जि.नाशिक) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाचा कर बुडविण्याच्या उद्देशाने तसेच चुकीची नंबर प्लेट व विना क्रमांकाची वाहने चालविणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. कोतवाली पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, बनावट नंबर प्लेट असलेला आयशर टॅम्पो हा पुण्याहून नगरच्या दिशेने येत आहे. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी तात्काळ केडगाव बायपास भागात पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांचे पथक सापळा लावून थांबलेले असताना केडगाव बायपास येथे पुणे-नगर हायवेने (एमएच ४१ बीएफ ९०९०) क्रमांकाचा आयशर टॅम्पो संशयास्पदरीत्या येताना दिसला. टेम्पो चालकाला पोलिसांनी अडवून कागदपत्राची विचारपूस केली असता कागदपत्रे नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोच्या चेचीस नंबर वरून माहिती काढली असता चालक व मालकाने संगणमत करून शासनाच्या कर बुडविण्यासाठी बनावट नंबर प्लेट बसविल्याचे निष्पन्न झाले. दहा लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो कोतवाली पोलिसांनी जप्त करून चालकास मोटार वाहन कायदा कलम २०७ प्रमाणे नोटीस देऊन कागदपत्र हजर करण्यास सांगितले असता कागदपत्र नव्हते. आरटीओ विभागाकडून सुद्धा सदर वाहनाची तपासणी करून घेण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान रमेश ईखे अभय कदम श्रीकांत खताडे यांनी केली आहे..
………………………………..
बनावट नंबर प्लेट लावणाऱ्यांवर कारवाई होणार : पोलीस निरीक्षक यादव
वाहनाच्या मूळ नंबर प्लेट सोबत छेडछाड करून बनावट नंबर प्लेट बसवणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहीम राबवून चुकीची नंबर प्लेट तसेच विनाक्रमांकांच्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.