पुणे,दि.२८:- पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने 54 लाख 67 हजार रूपये किंमतीच्या 162 दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती पुणे शहर गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे,गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांनी आज दि.28 रोजी घेतल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. यावेळी युनिट-6 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल व इतर अधिकारी उपस्थित होते.
पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पुणे शहर गुन्हे शाखेस वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करून व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेतील युनिट आणि दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक यांनी विशेष माहिम राबविण्यास सुरूवात केली होती.
गुन्हे शाखेतील युनिट-6 कडील पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलिस अंमलदार नितीन मुंडे आणि पोलिस अमंलदार सचिन पवार तसेच त्यांचे इतर सहकारी गेल्या एक महिन्यापासुन लातूर, धाराशिव, आणि बीड परिसरात वेशांतर करून गोपनियरित्या तपास करीत होते. त्यावेळी युनिट-6 च्या पथकास काहीजण हे धाराशिव जिल्हयातील गोविंदपुर (ता. कळंब) येथे चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्यास येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिस पथकाने सचिन प्रदिप कदम (32, रा. देवधानोरा, ता. कळंब, जि. धाराशिव), अजय रमेशराव शेंडे (32, रा. मु.पो. सहजपुर म्हस्कोबा चौक, ता. दौंड, पुणे), परमेश्वर भैरवनाथ मिसाळ (28, रा. गोविंदपुर, ता. कळंब, जि. धाराशिव) आणि युवराज सुदर्शन मुंढे (23, रा. गोविंदपुर) यांना अटक केली.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता अजय शेंडे व शिवाजी गरड हे चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी देत असल्याचे समजले.
ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टया परवडेल व वापरासाठी उपयुक्त ठरतील अशा दुचाकी ते लोकांना विकत होते.
पोलिसांनी सखोल चौकशी करून त्यांच्याकडून एकुण 100 मोटारसायकली जप्त केल्या. आरोपी अजय शेंडेविरूध्द 15 गुन्हे दाखल आहेत.
युनिट-4 च्या पोलिस पथकाने राहुल राजेंद्र पवार (21, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली, पुणे. मुळ रा. भिल्लारवाडी, जिंती, ता.जि. सोलापुर), गौरव उर्फ पिन्टया मच्छिंद्र कुसाळे (38, रा. सर्व्हे नंबर 10, वडारवस्ती, येरवडा, पुणे), संतोष अशोक कुमार सक्सेना उर्फ समीर शेख (29, रा. सर्व्हे नंबर 8/1, कंजारभाट वस्ती, येरवडा, पुणे) आणि प्रशांत उर्फ पप्पु सुबराव ठोसर (36, रा. आंबेडकर वसाहत, औंध, पुणे) यांना अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख 55 हजार रूपये किंमतीच्या 9 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव, पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलिस अंमलदार महेंद्र पवार, हरीष मोरे, प्रविण भालचिम, संजय आढारी, नागेश कुंवर, विनोद महाजन, स्वप्नील कांबळे, वैभव रणपिसे आणि मनोज सांगळे यांच्या पथकाने केली आहे.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक – 2 ने आरोपी किशोर उत्तम शिंदे (30, रा. वेताळ वस्ती, भापकरमळा, मांजुरी बु., पुणे), शाहिद कलिम शेख (19, रा. लेन नं. 1, दिगंबर नगर, वडगांव शेरी, पुणे), अमन नाना कनघरे (19, रा. आंबेडकर वसाहत, सुंदराबाई शाळेजवळ, चंदननगर, पुणे), नागनाथ आश्रुबा मेढे (29, रा. साईनाथनगर, वडगांवशेरी, पुणे) आणि ओंकार प्रफुल्ल टाटीया (22, रा. जैन मंदिर कात्रज, पुणे) यांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाख 67 हजार रूपये किंमतीच्या तब्बल 21 दुचाकी जप्त केल्या आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल पंधरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पाडवी, पोलिस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलिस अंमलदार राजेश अंभगे, अशोक आटोळे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ, अमोल सरतापे, संदीप येळे, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर आणि विनायक येवले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
युनिट- 2 च्या पोलिसांनी आरोपी भगवान राजाराम मुंडे (32, रा. परभणी) याला अटक करून त्याच्याकडून 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी इतर 13 वाहने देखील जप्त केली आहे. युनिट-2 च्या पोलिसांनी एकुण 4 लाख 65 हजार रूपये किंमतीच्या एकुण 19 दुचाकी जप्त केल्या आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल मोहिते, पोलिस अंमलदार मोहसिन शेख, उत्तम तारू, विनोद चव्हाण, विजय पवार, प्रमोद कोकणे, कादीर शेख, पुष्पेंद्र चव्हाण आणि समीर पटेल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.