पुणे,दि.२२:- अपघात झाला किंवा इतर काही क्राईम घडलं तर तक्रारकर्त्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी पोलीस विभागात आता ‘डायल ११२’ ही नवी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. तक्रारकर्त्याने फोन केल्यास दहाव्या मिनिटाला मदत दिली जाते. मात्र, ११२ क्रमांकावर फेक कॉल करणारेही असतातच. त्यामुळे या क्रमांकावर फेक कॉल केल्यास खबरदार, गुन्हादेखील दाखल होऊ शकतो. राज्य सरकारने सर्वच टोल फ्री क्रमांक आता एका डायल ११२ या क्रमांकावर आणले आहेत. ११२ क्रमांकावर कॉल केल्यास अवघ्या दहाव्या मिनिटाला मदत पोहोचविण्यात येणार आहे. पोलीस कार्यालयातील स्वतंत्र कंट्रोल युनिट स्थापन करण्यात आले असून, पोलीस अधिकारी व कंपनीचे अभियंता हे काम सांभाळत आहेत.२७ सप्टेंबरपासून डायल ११२ ही नवी अत्याधुनिक प्रणाली सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमध्ये अत्याधुनिक पोलीस वाहनेही उपलब्ध झाली असून, तक्रारदाराला क्विक रिस्पॉन्स मिळत आहे. मात्र, काही ठिकाणी चालणारे अवैध धंदे, व नवरा भांडतोय, बायको मारतेय, मुलगा अभ्यास करीत नाही, अशी कारणे सांगणे तसेच फेक कॉल करून पोलिसांचा वेळ वाया घालवून त्यांना त्रास देणे आता महागात पडणार आहे. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज असून, असे केल्यास त्यांच्यावरच गुन्हा दाखल होणार आहे.
फेक कॉल करून पोलिसांना त्रास देणाऱ्यांची कुंडली बाहेर काढली जाईल. त्याने कुठून कॉल केला, त्याचे नाव काय, हे सर्व पोलीस यंत्रणेत दिसणार असून, फेक कॉल करणाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण कॉल करून त्रास देणे बंद करण्याचे पोलिसांनी आवाहन केले.